Assembly Election : महाविकास आघाडीचा ‘स्ट्राइक रेट’ चांगला आहे. आघाडीच्या जवळपास 170 जागा निवडून येणार आहेत. सर्वाधिक चांगला ‘स्ट्राइक रेट’ विदर्भात असेल. लोक नाराज आहेत. काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत आहे. त्यामुळे लोक उघडपणे बोलत नाहीत. काही लोक बोलून नव्हे तर करून दाखवत असतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आमदर रोहित पवार यांनी केला. पवार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. पाच वर्षांपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरी बैठक झाल्याचा अजित पवारांनी म्हटलं होतं. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, अदानींना थेट विचारा की काय घडलं? ते मग आपल्याला दूध का दूध पानी का पानी सांगतील. आपल्या हातातून निवडणूक जात आहे. कोणताही पर्याय नसतो, तेव्हा खोटं बोलावं लागतं. खोटं बोलून आपले उमेदवार निवडून यावे, असा हा केविलवाणा प्रयत्न असावा. तो प्रयत्न अजित पवार करताना पाहायला मिळत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
मराठी अस्मितेचे प्रतीक
शरद पवार हे मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत. भाजपने महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार केला आहे. त्यामुळे आम्ही निश्चय केला की, महाविकास आघाडीचे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे, असे आमदार पवार म्हणाले. वणी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली. उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर वणी येथील हेलिपॅडवर लॅन्ड झाले. हेलिकॉप्टर वणीत उतरल्यानंतर निवडणूक विभागाचे अधिकारी हेलिपॅडवर पोहोचले. अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधील बॅग आणि साहित्याची तपासणी केली.
यावर आमदार रोहित पवांरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बॅग तपासणीबाबतही पवारांनी भाष्य केलं. या अगोदर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितले की, तपासणी करायची असेल तर सगळ्यांचीच करा. केवळ काही लोकांची करू नका. लोकं पेटून उठल्यावर आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयोग तपासायला लागला आहे.
उद्धव ठाकरे यांची ज्या लोकांनी बॅक तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिलं. ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न चेक करणाऱ्यांवर काय कारवाई केली? ते पत्र समोर यायला हवं, असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्र पोलिस असताना मध्य प्रदेश पोलिसांना बॅग तपासणी करण्यासाठी कशाला आणता? लोकांना दाखवण्यासाठी का होईना मात्र सत्तेतील लोकांची बॅग तपासणी होत आहे, ही चांगली गोष्ट असल्याचं रोहित पवार म्हणाले.