महाराष्ट्र

Rajendra Shingne : नाईलाज होता म्हणून अजितदादांसोबत गेलो!

NCP Politics : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणेंचं मोठं विधान; शरद पवारांसोबत जाणार?

”मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाइलाज असल्याने मी अजितदादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने 300 कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आहेत’, अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. शिंगणे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांसोबत जाणे नाइलाज होता असे सांगितले. त्यामुळे शिंगणे परतीच्या प्रवासाचा विचार करत असल्याची चर्चा होत आहे.

विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सध्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघात सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. असं असतानाच काल वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं विधान केलं. “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असं राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. याचवेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक केलं. आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राजेंद्र शिंगणेंनी स्पष्टच सांगितले 

“गेली अनेक वर्षे मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचं नेतृत्व आश्वासक

“मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांची साथ सोडणार ?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून राजेंद्र शिंगणे हे नेतृत्व करीत आहेत. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनीही अजित पवारांची साथ दिली. राजेंद्र शिंगणे हे सध्याही अजित पवार गटात आहेत. मात्र, आज त्यांनी केलेल्या विधानंतर ते अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!