लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे राज्यात चांगलाच डंका वाजविला. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार हे किंगमेकर ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह दिले. याच चिन्हावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली आणि यशही मिळविले. मात्र काही ठिकाणी पक्षाला पराभवाचा देखील सामना करावा लागला. या ठिकाणी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना ‘तुतारी’ हेच चिन्ह दिल्याने हा पराभव झाल्याचा आरोप आता निवडणूक आयोगावर करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढे आणली आहे. पाटील यांच्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाद्वारे ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र यासोबतच अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हेच चिन्ह देण्यात आले. त्या चिन्हात केवळ तुतारी अर्थात पिपाणी होती.
आयोगाने चिन्हाखाली ‘तुतारी’ शब्द लिहिल्यामुळे मतदार प्रचंड संभ्रमात पडले आणि ‘तुतारी’ असे लिहिलेल्या पिपाणी चिन्हावर लाखो मते पडल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे शरद पवार गटातील उमेदवारांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
‘तुतारी’च्या घोळामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असे नाव आहे. चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या पक्षाने आता ‘पिपाणी’ हे चिन्ह येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.
पिपाणीला 37 हजार मते, तुतारीला 45 हजार
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 45 हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात 37 हजार मते अपक्ष उमेदवाराच्या ‘पिपाणी’ ला पडली. याबाबत जयंत पाटील म्हणाले होते, आम्ही भाषणात तुतारी चिन्हाचा प्रचार करत होतो. पण मतदारांमध्ये संभ्रम झाला. आम्ही यासदंर्भात निवडणूक आयोगाकडे मतदानापूर्वी तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. दरम्यान, आता पक्षाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, त्यांनी पिपाणी हे चिन्ह वगळावे. तसेच शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.