Baramati : लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीतील एका पक्षाने आपण शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. आपला पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे जाऊन त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. काही आप पक्षाच्या नेत्यांची देखील भेट घेतली. याशिवाय राज्यातही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे मविआत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत वेगवेगळे दावे नेत्यांकडून केले जात आहेत.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीला चांगलं यश आलं तर मुख्यमंत्री कोण होईल, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ‘विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचं सरकारन येणं अवघड आहे. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे. आम्हाला कोणत्याही पदाची इच्छा नाही’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Narayan Rane : राणे म्हणतात, मला शिव्या देणाऱ्याचा शोध घेतोय!
दिवंगत सुषमा स्वराज यांना गुरु मानते
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन शरद पवार गटाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातोय. सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. ‘भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही. आधी भाजपचे नेते आणि आमच्या मतभेद असायचे. पण तरीही अशी अवस्था नसायची. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना मी गुरु मानते. आताच्या भाजपत अशा नेत्यांची खरंच उणीव आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तर संघाचं स्वागतच आहे
‘माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे की, जातीय जनगणना व्हायला हवी. आरएसएसची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते,’ अशीदेखील प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.