नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पदाधिकाऱ्यांनी नागपुरात चांगलाच जोर लावला. दुसरीकडे महायुतीमध्येही अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांची हिच स्थिती होती. आता हीच आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या इच्छुकांची मोठी अडचण होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे नागपूर शहरात विभाजित झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना या पक्षांतील इच्छुकांची चांगलीच कुचंबणा होणार असल्याचे चित्र आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महायुतीचे उमेदवार असल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्र्यांची शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कमळाला मतदान करण्यासाठी प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार तसेच शिवसेनेचे अध्यक्ष सूरज गोजे हे गडकरी यांच्यासोबतच प्रचार यात्रांमध्ये फिरत होते. गडकरी यांच्या जाहीर सभेलाही सर्व उपस्थित होते. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही गडकरी यांनी सोबत ठेवले होते.
दुसरीकडे काँग्रेसचे विकास ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी गळ्यात भगवा घालून पंजाला मतदान करण्याचे आवाहन केले. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून कुमेरिया आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव एकमेकांच्या विरोधात लढले होते. प्रशांत पवार हे पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे आणि भाजपचे माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या विरोधात लढलेले आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पंजासाठी मते मागितली. ते पूर्व नागपूर विधानसभेतून लढण्याची तयारी करीत आहे. राष्ट्रवादीसाठी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांना कमळासाठी काम करावे लागले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे त्यांचे कट्टर राजकीय वैरी आहेत.
नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी असलेले पक्ष आणि पदाधिकारी आपसातील मतभेद विसरून कामाला लागले. अशीच परिस्थिती महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेची होती. आता विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहिल्यास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची मोठी अडचण होणार आहे. शहरात भाजपचे चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे अस्तित्व व वजन बघता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील इच्छुक उमेदवारांची मोठी कुचंबणा होणार आहे.