BJP Rashtravaadi : राज्यातील सत्ता समीकरण बाजूला ठेवून तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची हातमिळवणी झाली. भंडारा जिल्ह्यात हे पाहायला मिळाले. त्यामुळे भविष्यातील राजकारणाचे समीकरण बदलवणारी ही निवडणूक ठरल्याची चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे.
अडीच वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, भाऊराव तुमसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.राज्यातील सत्ता समीकरण बाजूला ठेवून येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हातमिळवणी करून बळीराजा जनहित पॅनल स्थापन केले होते. या पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून 10 संचालक निवडून आणले.
18 संचालक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आमदार राजू कारेमोरे यांच्या पॅनलचे चार व चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलचे तीन संचालक निवडून आले. एका अपक्ष संचालकाने येथे बाजी मारली.
स्थानिक युती वैशिष्ट्यपूर्ण
बळीराजा जनहित पॅनल भाऊराव तुमसरे व भाजप नेते माजी मंत्री डॉ.परिणय फूके यांच्या नेतृत्वात लढले. भाजप व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही युती होती. यात काँग्रेसचेही सदस्य एकत्र आले होते. त्यांच्या गटाचे 10 संचालक निवडून आले. या गटात 11 संचालकांपैकी नऊ संचालक निवडून आले. तर जय किसान महाविकास पॅनलचा एक व शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा एक संचालक निवडून आला. ग्रामपंचायत गटात जय किसान महाविकास पॅनलचे दोन तर शेतकरी विकास पॅनलचे दोन संचालक निवडून आले.
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत चढाओढ, थांबली ‘प्रन्यास’ची
भविष्यातील निवडणुकीची रंगीत तालीम
राज्याच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकमेकांविरोधात आहेत. मात्र, भंडारा बाजार समितीच्या निवडणूक हे दोन्ही विरोधक एकत्र आल्याचे दिसले. बाजार समितीची निवडणूक पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत झालेली भाजप आणि शरद पवार गटाची युती भविष्यातही टिकेल अशा चर्चेला उधाण येऊ लागलेले आहे. त्यामुळे ही निवडणूक नक्कीच भंडारा जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलवणारी ठरली आहे.