Pune Accident : पुणे हिट अँड रन केस प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. यावरुन अजित पवार गटाचे युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. ही टीका अंजली दमानिया यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरुन त्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा दाखला देत सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, मला पंतप्रधान मोदी यांचे एक भाषण खूप आवडले. ते ऐकल्यानंतर मला काही सूचेना. लोकसभेत केलेल्या भाषणात मोदींनी गॅरंटी दिली. मोदींनी एक ट्विट केले ते वाचून दाखवते “जिसने खाया है उसे बाहर निकालूंगा, जिसका खाया है उसको लौटाऊंगा” हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं. मला मोदींना विचारायचं आहे, की महाराष्ट्राचे 70 हजार कोटींचा जो स्कॅम झाला. नंतर तो 1 लाख 10 हजार कोटीपर्यंत गेला. त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडून परत घेणार का? आणि महाराष्ट्राला परत देणार का? असा घणाघात अंजली दमानिया यांनी केला आहे.
माफी मागावी अन्यथा….
राजकारणात यांना महिलेने काही बोललेलं अजिबात खपत नाही. त्या महिलेला बाजूला करायचं असेल तर तिच्याबद्दल खालच्या पातळीवर येऊन वाटेल ते बोलायचे. सूरज चव्हाण आणि अजित पवारांना माझी वॉर्निंग आहे. त्यांनी जी भाषा आता वापरली ही बाई काय रिचार्जवर काम करते, सुपारी घेते, असले फालतू डायलॉग त्यांनी खिशात ठेवावे. चव्हाणने माझी माफी मागावी अन्यथा या व्यक्तीला मी सोडणार नाही, इशा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे
आता राजकारणात सगळ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आम्ही जे प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दिलेच पाहिजे. जर तुम्ही खालच्या दर्जाची स्टेटमेंट केली तर यापुढे तुम्हाला सोडणार नाही. ही सुद्धा अद्दल तुम्हाला घडवायला पाहिजे म्हणून मला त्याची प्रतिक्रिया हवी आहे. महिला नेत्या रूपाली चाकणकर, चित्रा वाघ, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी या सगळ्यांकडून मला प्रतिक्रिया पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.