Chagan Bhujbal Meets Sharad Pawar : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 15) अचानकपणे वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. घरून निघताना प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याबरोबर चर्चा केली होती. शरद पवारांशी कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे, हे त्यांना ठाऊक होते, असे भुजबळ म्हणाले. ही राजकीय भेट नव्हती, असेही ते म्हणाले. कोणतीही अपॉइंटमेंट नसताना ही भेट अचानक झाली आहे.
साडेदहाला भुजबळ पवार यांच्याकडे दाखल झालेत. प्रकृती बरी नसल्याने तेव्हा पवार झोपलेले होते. त्यामुळे भुजबळ एक-दीड तास थांबले. त्यानंतर सुमारे दीड तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पवार बिछान्यावरच झोपले होते. प्रकृती बरी नसल्याने ते उठले आणि बाजूला खूर्ची ठेवून आम्ही दीड तास चर्चा केली, असे भुजबळ यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून राज्यातील परिस्थिती स्फोटक झाली आहे. यावर भुजबळ आणि पवार यांनी चर्चा केली.
एकोप्यासाठी पुढे या
महाराष्ट्रामध्ये ओबीसींना (OBC) आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. काही जिल्ह्यांमध्ये आता स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा (Maratha) समाजात जात नाहीत. ओबीसी, धनगर, वंजारी, माळी समाजासोबत मराठा येत नाहीत, असे चित्र आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून पुढे यावे, अशी विनंती पवारांना केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावर मराठा, ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे मला माहिती नाहीत असे शरद पवार म्हणाल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
लवकरच पवार मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करणार आहेत. येत्या काळात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. यावरही चर्चा झाली. शरद पवारांनी या चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली. प्रकृती बरी नसल्याने ते येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहेत. मराठा आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये, यासाठी कोणालाही भेटायला तयार आहे. अगदी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटेन, असे छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. या भेटीबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याबद्दल भूमिका व्यक्त केली.
भुजबळ यांच्या भेटीची पूर्वकल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तटकरे म्हणाले की, भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर पवारांच्या भेटीमागचे कारण जाणून घेईल. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. ते कुणाला भेटायला जात असताना आमची कुणाची परवानगी घ्यायची त्यांना गरज नाही, असे तटकरे म्हणाले.
Maratha Reservation : पवार, ठाकरे, वडेट्टीवार यांच्या फोटोसह बॅनरबाजी
बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसन्मान सभे’मध्ये भाषण करताना भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता.