राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती दिल्ली ट्रीब्यूनलकडून सोडवण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज (7 डिसेंबर) सकाळी नागपुरात दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर यासंदर्भात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यासंदर्भात नुकतीच एका वृत्तवाहिनीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या चर्चा झडली. यावेळी चर्चेमध्ये पुन्हा ‘वाशींग मशीन’ आणण्यात आली. ‘तुम्ही भाजपसोबत आहात म्हणून डाग स्वच्छ झाले’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आली. तेव्हा प्रशांत पवार यांनी संजय राऊत आणि किशोर तिवारींना चांगलेच धुवून काढले.
राऊत शिवसेना संपवायला निघाले
प्रशांत पवार म्हणाले, ज्या एजंसी चौकशी करत होत्या, त्यांना काही तथ्थ आढळलं नसेल. त्यामुळे क्लिन चीट देण्यात आली असेल. प्रफुल पटेल यांच्यावरसुद्धा कुठल्या एजंसीने एफआयर दाखल केलेला नाही, हे संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेनेला समजायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. त्यामुळे त्यांचे पोट दुखत आहे आणि वाचलेली शिवसेनासुद्धा संजय राऊत संपवायला निघाले आहेत.
अजित पवार असल्या फालतू गोष्टींवर कधीच कमेंट करत नाहीत. अजित दादांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चौकशीत काहीही तथ्थ्य आढळले नाही. त्यामुळे त्यांना क्लिन चीट देण्यात आली. जेव्हा उद्धव ठाकरे यांची सत्ता होती, तेव्हाही क्लीन चीट देण्यात आली होती. किशोर तिवारींना ही बाब चांगल्या पद्धतीने माहिती आहे. संजय राऊत रोज सकाळी राज्यातील लोकांची दिशाभूल करतात. कारण त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीही नाही, असे प्रशांत पवार म्हणाले.
सध्या संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वकीली करताना दिसतात. कधी जवाहरलाल नेहरुंची, तर की इंदिरा गांधींची प्रशंसा करतात. पण स्वतःच्या पक्षाची प्रशंसा किंवा वकिली ते करताना दिसत नाहीत. ही त्यांची खेळी जास्त दिवस चालणार नाही. थोड्याच दिवसांत ही नौटंकी बंद झालेली पहायला मिळेल, असा घणाघात पवार यांनी केला.
Puja Khedkar : न्यायालयीन लढा सुरूच; औरंगाबाद खंडपीठात याचिका
शिवसेनेचाच विरोध होता
कुणाला गद्दार म्हणणे, बिना बापाचा म्हणणे, हा काय प्रकार आहे? संजय राऊत राज्यसभा सदस्य आहेत. त्यांना हे शोभत नाही, असे पवार यांनी तिवारींना सांगितले. त्यावर विदर्भ केव्हा वेगळा करत आहात, असा प्रश्न किशोर तिवारींनी केला. त्यावर पवारांनी तिवारींनाही धुवून काढले. ते म्हणाले, विदर्भाचा विकास वेगाने होतो आहे, तर मग विदर्भ वेगळा कशाला करायचा? विदर्भ वेगळा करायला शिवसेना तयार आहे का, असे प्रश्न करत सर्वात पहिले शिवसेनेनेच वेगळ्या विदर्भाला विरोध केला होता, अशी आठवण प्रशांत पवार यांनी तिवारींना करून दिली.
जेव्हा शरद पवार वेगळा विदर्भ करायला तयार होते, तेव्हा शिवसेनेनेच विरोध केला होता. आजही शिवसेना वेगळ्या विदर्भाच्या विरोधात आहे. पण देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विदर्भाच्या विकासाचे काम वेगाने सुरू केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडमध्ये जी विकास कामे सुरू आहेत, ती खरंच चांगली आहेत. तुमच्याकडे 20 आमदार आहेत. पण त्यातीलही 10-12 आमदार इकडे-तिकडे संधी शोधत आहेत, असे म्हणत पवारांनी किशोर तिवारींना निरूत्तर करून सोडले.