महायुतीतील तिन्ही पक्षांकडून विविध मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच जागावाटपावरून घमासान सुरू आहे. तर काही जागांचे वाटप होऊन देखील नाराजी नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान अकोल्यातील पाच पैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला न सुटल्याने आमदार अमोल मिटकरींनी खंत व्यक्त केली आहे. अकोट मतदारसंघावर आमदार मिटकरींनी स्वतः दावा केला होता. मात्र याठिकाणी पुन्हा भाजपचे भारसाकळे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यापूर्वी आघाडी आणि युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. तर अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे. बंडखोरी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. महाविकास आघाडीसह महायुतीतही मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अकोला जिल्ह्यातील दोन जागांवर दावा करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी चार जागा भाजपा ला तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली असल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
प्रकाश भारसाकळे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांचा अकोटवरील दावा संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळं आमदार अमोल मिटकरी यांचं विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगल्याच्या चर्चा होत्या, तर दुसरीकडे मिटकरी यांनीही याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
हे तर वेदनादायी!
अकोला जिल्ह्यातील एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडण्यात आली नाही. जिल्ह्यातील चार जागांवर पुन्हा भाजपचाच उमेदवार निश्चित आहे. अशातच आमदार मिटकरींनी खंत व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट वरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मिटकरी यांनी केलेल्या पोस्ट मध्ये ‘अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे”, असं मिटकरींनी म्हटलं आहे.
तर पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम , बुलडाणा जिल्ह्यात एकाही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसणे हे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी वेळी निश्चित आमच्याकरिता चिंताजनक बाब राहील. तिन्ही जिल्ह्यात घड्याळ चिन्हच नाही याचा खेद वाटतो, अशी पोस्ट देखील अमोल मिटकरींनी यावेळी केली आहे.
तर आमदार मिटकरींनी अकोट मतदारसंघावर दावा केला होता. मात्र ही जागा भाजपला सुटली आहे.त्यामुळे आमदार मिटकरींनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. माझं अकोट यांचे विधानसभा लढण्याच स्वप्नं भंगलंं. मी या भागात चार वर्ष अखंड मेहनत घेतली. पण पक्षाचा निर्णय अंतिम असतो. अकोटमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या प्रकाश पाटील भारसाकळे यांचे अभिनंदन. अजितदादा आणि पक्षासाठी अकोटवरचा दावा सोडला. शेवटी महायुती विजयी होणं हेच लक्ष असेल”,असंही त्यांनी म्हटलं आहे.