Discussion On New Look : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी ‘ड्रेसिंग स्टाइल’मुळे. उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दादांनी मेट्रो सफारी केली होती. त्यावेळी त्यांना जीन्स-शर्ट आणि गॉगल या ‘लूक’वर बरीच चर्चा झाली. आता दादा काही दिवसांपासून पिंक जॅकेटमध्ये दिसत आहे. दादांनी लूक बदलला म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना बॉस. सध्या जिकडेतिकडे दादांच्या या नव्या लूकचीच चर्चा आहे. दादांनी अलीकडेच अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी योजनांची घोषणा केली. त्यापूर्वीपासूनच त्यांनी पिंक जॅकेट वापरायला सुरुवात केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या सल्लागारपदी नरेश अरोरा यांची नियुक्ती केली आहे. अरोरा यांच्या सल्ल्यानंतरच दादांची पिंक जॅकेट वापरण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. नारीशक्तीचे मन जिंकण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशात दादांना अनेकांनी पिंक जॅकेटबद्दल टोकले. पुण्यात प्रसार माध्यमांवर दादा यामुळे संतापलेही. ‘तुला काही त्रास होतोय.. मला व्यक्ती स्वातंत्र आहे. मला काय घालायचे त्याचा मला अधिकार नाही का? मी माझ्या पैशानी घालतो.. तुमच्या पैशांनी घालतो का? जे कॉमन मॅन घालतो तेच मी घालतो..’, असे उत्तर दादांनी दिले.
महिलेनेच विचारला प्रश्न
दादांच्या या गुलाबी लूकवर चर्चा पुन्हा सुरू झाली, ज्यावेळी अहमदनगरमध्ये एका महिले त्यांना प्रश्न विचारला. नगरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात दादांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी एका महिलेने त्यांना तुम्ही गुलाबी जॅकेट का घालता असा प्रश्न विचारला. गुलाबी हा तुमचा आवडता रंग आहे का? असेही या महिलेने विचारले. पत्रकारांवर संतापणाऱ्या दादांनी मात्र या कार्यक्रमात संयम दाखवित आपल्या शैलीत उत्तर दिले. एखाद्या महिलेची काही लोक स्तुती करतात. तुम्हाला ही साडी चांगली दिसते. तुम्ही या साडीत चांगल्या दिसता. तसाच काहींनी आपल्याला या जॅकेटबद्दल सांगितले. मी या जॅकेटमध्ये जरा चांगला दिसतो, असे अनेकांनी सांगितले. त्यामुळे वापरतोय हे जॅकेट असे उत्तर दादांनी दिले.
Devendra Fadnavis : वाढदिवसाला पुरविला दिव्यांग विद्यार्थ्यांचा हट्ट
सध्या अजित पवार अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत. माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला. महिलांशी संवाद साधला. पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर आणि कर्जतमध्ये त्यांनी सभा घेतल्या. या सर्वांत ते गुलाबी जॅकेटमध्येच दिसले. दादांच्या गुलाबी जॅकेटवरून त्यांच्या विरोधकांनी टीकाही केली आहे. अमोल कोल्हे यांनी दादांना गुलाबी राजकारण करायचे असल्याचे दिसते अशी टीका केली. त्यामुळे सकारात्मक चर्चा असो की टीकाकारांचे बोल, दादांच्या गुलाबी जॅकेटने जबरदस्त चर्चेचे स्थान मिळविले आहे, हे नक्कीच.