महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मलिक यांच्या उमेदवारीबाबत एकाच वाक्यात विषय संपवला

NCP : अजित पवार यांनी एबी फॉर्म दिल्याचा मुद्दा 

Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. नवाब मलिक यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने त्यांना सोबत घेण्याबाबत भाजपचा विरोध आहे. हा विरोध ठाऊक असतानाही अजित पवार यांनी मलिक यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात मंगळवारी (29 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे किंवा नाही याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. या संदर्भात योग्य ती माहिती मिळाल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते प्रतिक्रिया देतील, असं नमूद करीत फडणवीस यांनी एका वाक्यातच हा विषय संपवला. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले नवाब मलिक महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर विधान भवनात आले होते. विधान भवनात पोचल्यानंतर मलिक हे थेट राष्ट्रवादी काँग्रेस साठी असलेल्या बाकांवर जाऊन बसले होते. त्यानंतर भाजपने अजित पवार यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र मलिक यांच्या नावाला विरोध असल्याचे ठाऊक असतात नाही अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जागावाटप पूर्ण 

महायुती मधील घटक पक्षांचे जागावाटप पूर्ण झाले आहे. जवळपास सर्वच उमेदवारांची घोषणा झाली आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात अंदाजे तीन ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेतही फडणवीस यांनी दिले. राज्यभरातून महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

फेक नेरेटिव्ह

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ‘फेक नेरेटिव्ह’ पसरवला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुती आणि भाजप विरोधकांच्या या अपप्रचाराला ‘थेट नेरेटिव्ह’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. विधान परिषदेतील काही आमदारांना महायुतीने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या आमदारांच्या नावात बदल होऊ शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले. भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी सर्व भेद बाजूला ठेवत काम करण्याची आवाहन केले. महायुतीची सत्ता आणायची असेल तर सर्वांना एकत्र येऊन काम करावेच लागेल, असे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी निर्माण झाली आहे. अशात केवळ महायुतीच महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार देऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!