Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातआमदार बच्चू कडू यांनी महायुतीत असतानादेखील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात आपला उम्मेदवार उभा केला होता. येवढंच नव्हे तर कडाडून विरोध करीत राणांना पराभूत करण्याची शपथदेखील त्यांनी खाल्ली होती. दरम्यान काल (ता. 13) अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर आपल्या पराभवाची कारणे सांगीत बच्चू कडूंवर निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत अमरावतीत आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. त्याचा फायदा महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. “काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात”, “अमरावतीमध्ये आमच्या नेत्यांना माहित आहे की काय घडले. आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगायची गरज नाही”,
यंदा जनतेने मला का थांबवले ?
मी माझ्या मतदारसंघासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यानंतर मला कळलेच नाही की यंदा जनतेने मला का थांबवले ? यावेळी नवनीत राणा यांना विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उभं राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “राज्यात काम करायचे की कुठे हे ठरविले नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.
पराभूत होऊनही आम्ही जिंकलो..
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत, कारण आमचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, असं म्हटलं आहे. तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं असून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे, असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आपण दिल्लीला गेला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी नवनीत राणा यांना विचारला असता त्यावर “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधा होता. मी भाजपाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे दिल्लीत जाण्यात काहीही गैर नाही.” मोदी एकटे लढले. त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोकं झुंड बनवून त्यांना रोखत होते”, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
..तर मी एससी आणि एसटीसोबत उभी राहीन !
एससी आणि एसटीचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल, तर मी एससी आणि एसटीचे समाजासोबात उभी राहीन, असं नवनीत राणा म्हणाल्या. “एससी आणि एसटी समाजातील लोकांना उद्देशून खोट्या स्वरूपात संविधान बदलले जाईल, असा प्रचार केला. लवकरच एससी आणि एसटी समाजाला या खोट्या प्रचाराची जाणीव होईल”, असा दावा नवनीत राणा यांनी केला.
ठाकरेंवर टीका..
नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू. पण सर्वांनी पाहिले मोदींनी शपथ घेतली. शेर आखिर शेर ही होता है. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.