Mahayuti 2.0 : निवडणुकीत पराभवानंतर संजय राऊत आणि बच्चू कडू यांची अवस्था वाईट झाली आहे. आता त्यांच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. बच्चू कडू यांनी माझी लायकी काढली. माजी सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांची लायकी काढणाऱ्यांची लायकी जनता जनार्दन काढत असते, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. त्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता मुंबईतील सागर बंगल्यावर आल्या होत्या. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नवनीत राणा यांनी महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. संजय राऊत यांचे नाव काढल्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरती वेडेवाकडे भाव केले. संजय राऊतांनीही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सतत भाजपावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांचे सूर आता बदलले आहेत, अशी चर्चा होऊ लागली आहे. या संदर्भात विचारल्यानंतर नवनीत राणा यांनी थट्टा केल्याप्रमाणे हसत प्रतिक्रिया दिली.
आम्ही सैनिक आहोत
आम्ही देवेंद्र फडणवीसांचे सैनिक आहोत. आम्ही भाजपाचे कार्यकर्ता आहोत. अडीच वर्षांपूर्वी फडणवीसांनी जो त्याग केलाय तो त्यांना पुन्हा रिपीट करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. भाजपा फडणवीसांनाच मुख्यमंत्री करतील, अशी आशा आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. अरे देवा…! कोणी कौतुक केलं? संजय राऊतांनी? मी असं ऐकलंय की वेळेनुसार लोकांचे सूर बदलतात. पण अशा लोकांचेही सूर बदलतात, हे मी पहिल्यांदाच पाहतेय. मला असं वाटतं लेय की संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही बदलेल, अशी प्रतिक्रिया देखील नवनीत राणा यांनी व्यक्त केली.
काही लोकांनी मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ विषारी पद्धतीने टीका करणे चालवले होते. या सगळ्यांना आता मतदारांनी धडा शिकवला आहे. त्यामुळे महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती व्हावी, अशी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा ओळखून आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनाच बसवतील असा विश्वास आहे नवनीत राणा यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या विकासाला आणखी वेग येईल असेही नवनीत राणा म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणे म्हणजे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जबरदस्त चपराक असल्याचेही त्या म्हणाल्या.