Election Process : मतदान यंत्राबाबत काँग्रेसकडून अपप्रचार करण्यात येत आहे. मतदान यंत्रांच्या विश्वसनीयतेवर काँग्रेसला इतकी शंका असेल तर त्यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांचा राजीनामा घ्यावा. त्यानंतर हवं तर अमरावतीची लोकसभा निवडणूक पुन्हा मतपत्रिकेवर घ्यावी, अशी टीका अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
राणा म्हणाल्या, लोकसभेमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर संख्या बळ मिळाले. त्यावेळी ईव्हीएममध्ये कोणतीही गडबडी काँग्रेसला दिसली नाही. मात्र विधानसभेच्या वेळी जो निकाल लागला त्यावरून मतदान यंत्रांमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्या ठिकाणी मध्ये गडबडी झाली नाही का? असा प्रश्नही नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
ताकद लागते
कोणत्याही निवडणुकीत आलेले अपयश वाचवण्यासाठी ताकद लागत असते. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कार्यरत आहे. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रातील जनतेला विकास हवा होता. हा विकास पाहिजे असेल तर महायुती सरकार शिवाय पर्याय नाही हे लोकांना ठाऊक होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये किती विकास झाला हे लोकांनी पाहिले होते. त्यामुळे जनतेला आघाडीचे भ्रष्ट सरकार नको. परिणामी मतदारांनी महायुतीला आपला कौल दिला, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
काँग्रेसला ईव्हीएमवर अजिबात विश्वास नसेल तर त्यांनी लोकसभेत विजयी झालेल्या सर्व खासदारांचे राजीनामे घ्यावे. त्यानंतर सरकारने अवश्य याच मतदारसंघांमध्ये मतपत्रिकांवर निवडणूक घ्यावी. काँग्रेसकडून आपल्या सोयीने ईव्हीएमला याचा निर्णय घेण्यात येतो. काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएम चांगले. काँग्रेसच्या विरोधात निकाल लागला तर ईव्हीएम खराब असा प्रकार चालतो. काँग्रेसच्या नेत्यांना ईव्हीएमवर विश्वास नसेल तर, त्यांनी याचा पुरावा सादर करावा, असा आव्हानही नवनीत राणा यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरामध्ये ईव्हीएमला विरोध होत आहे. काही ठिकाणी मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याचा प्रकार झाला. मात्र प्रशासनाकडून मतदानाचा हात प्रयत्न हाणून पाळण्यात आला. आता महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या विरोधात ‘लॉंग मार्च’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसणार आहे. भारतीय जनता पार्टी कडूनही या विरोधाला प्रतिविरोध होताना दिसणार आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या ईव्हीएमवर आरोप करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुती मधील सर्वच नेते महाविकास आघाडी मधील तीनही पक्षांना ‘चॅलेंज’ करताना बघायला मिळत आहेत.