Mind Game Of BJP : अमरावती जिल्ह्यामध्ये एका दगडात तीन पक्षी मारण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. मात्र हे तीनही पक्षी टिपण्यासाठी कोणाला शिकारी नेमायचं, यावर रविवारी सागर बंगल्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मंत्रिमंडळात अमरावती जिल्ह्याचा समावेश 100 टक्के राहणार आहे. मात्र मंत्रीपद रवी भैया यांना देणार की नवनीत भाभी यांना? यावर सागर बंगल्यावर चर्चा झाली.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस तीन प्रमुख नेत्यांसह दिल्लीकडे रवाना झालेत. दिल्लीला जाण्यापूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे नवनीत भाभी या भैय्यांसाठी भेटल्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र रविवारी रवी राणा सकाळीच सागर बंगल्यावर दाखल झालेत. त्यानंतर अमरावतीमध्ये ‘कमळ’ नवनीत राणा यांच्याच हाती उमलू शकते अशा शक्यतेने जोर धरला.
स्टार प्रचारक
नवनीत राणा या रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष सोडून भाजपमध्ये आल्या आहेत. भाजपच्या चिन्हावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. सध्याच्या स्थितीत नवनीत राणा आणि रवी राणा भाजपसाठी जवळचे झाले आहेत. रवी राणा हे महायुतीमध्ये असले तरी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. याउलट नवनीत राणा या भाजपच्या सदस्य आहेत. त्यामुळे रवी राणा यांच्या ऐवजी नवनीत राणा यांना मंत्रिपद मिळावं यासाठी फिल्डिंग सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा यांना विधान परिषदेवर घेण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा आंदोलन केले. केंद्रामध्ये खासदार असतात नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी यांचे सतत कौतुकच केले. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व्यापक प्रचार केला. सुरुवातीपासूनच रवी राणा हे नवनीत राणा यांना मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. खासदार असताना त्यांनी केंद्र सरकारकडून मंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यात यश मिळालं नाही.
आता करणार शिकार
नवनीत राणा कोणत्याही मिरवणुकीत नेहमीच धनुष्यबाण ओढण्याची कृती करताना दिसतात. त्यामुळे त्यांना मंत्री करून आणि अमरावतीचे पालकमंत्री पद देऊन भाजप मोठी शिकार करण्याच्या तयारीत दिसत आहे. महायुती आणि भाजपला सतत डिवचणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर ‘प्रहार’ करण्यासाठी राणास्त्राचा वापर भाजप करू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे यशोमती ठाकूर यांच्या तोडीला तोड म्हणून महिला नेतृत्व अमरावती जिल्ह्यात नव्याने तयार होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी भाजपची बरीच अडवणूक केल्याचं सांगण्यात येतं.
Ravi Rana : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीत बंद दाराआड चर्चा
आनंदराव अडसूळ यांनी तर भाजपकडून राज्यपालपद मागितलं. भाजपनं पद देऊ केलं होतं. पण निवडणुकीत अडसूळ यांनी भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे राणा यांना मंत्री करून भाजप अडसूळ यांच्याशी देखील दोन हात करू शकते. याशिवाय फडणवीस यांच्या टीममधील विश्वासू व्यक्ती म्हणून अमरावती दोन आमदार होतील. सद्य:स्थितीमध्ये बुलढाण्यात संजय कुटे, अकोल्यामध्ये रणजीत पाटील, वर्धामध्ये सुमित वानखडे, नागपूरमध्ये संदीप जोशी, प्रवीण दटके, भंडारा-गोंदियात डॉ. परिणय फुके आहे ‘टीम फडणवीस’ आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील आपलं नेटवर्क मजबूत करण्यासाठी राणा यांना संधी दिली जाऊ शकते.