BJP News : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील दसरा मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
सभेत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मी अमरावतीच्या विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा मेळघाटपासून तर अमरावतीच्या शेवटच्या टोकापर्यंत कार्यरत राहणार आहे. यासाठी मला तुमच्या एका मताची आवश्यकता आहे. आमदार रवी राणा यांनी प्रहारचे पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यावर सडकून टीका केली.
आमदार राणा म्हणाले की, मागील 20 वर्षात अचलपूर मतदारसंघात मोठा विकासाचा अनुशेष निर्माण झाला आहे. बच्चू कडू यांनी कुठलीही विकास कामे न करता ‘सेटलमेंट’वर लक्ष दिल्याने अचलपूरचा विकास रखडला आहे. सातत्याने सत्तेसोबत राहून मैत्री करायची आणि नंतर दगा द्यायचा, असा त्यांचा स्वभाव आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी अहोरात्र कार्य करीत आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पेक्षा अधिक खासदार निवडून द्यायचे आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचा रान करा ही लढाई तत्त्वाची आहे ही लडाई विकासाची आहे.
राणा यांचा मार्ग खडतर
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा मार्ग यंदा खडतर राहणार आहे. महायुती मधील प्रत्येक नेत्याचा नवनीत राणा यांच्या नावाला विरोध आहे. अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांशी राणा दांपत्याचे वैर असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी लेखी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, अरे ठाम भूमिका माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांच्यासोबत तर माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी घेतली होती. अडसूळ पिता पुत्रानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनीही राणा यांच्या विरोधात काम करण्याचा इशारा दिला होता.
जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे वैर असल्याने नवनीत राणा यांच्या विजयाचा मार्ग अतिशय खडतर झाला आहे. महायुती मधील सर्वच नेत्यांची नाराजी व राणा यांच्या नावाला असलेला विरोध याकडे दुर्लक्ष करीत भाजपने नवनीत राणा यांना पक्षात सहभागी करून घेत उमेदवारी दिली आहे. राणा यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केले, महायुती मधील तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.