विधानसभा निवडणुक अवघय दोन महिन्यावर येऊन ठेपलेली असल्याने राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्रीपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीतही अनेक जण इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावे तर दावेदारांच्या यादीत आधीपासूनच आहे. तर उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील अशी महाविकास आघाडीतील इच्छुकांची नावे आहेत. महायुतीच्या दावेदारांमध्या आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे भाजप आमदार पंकजा मुंडे यांची.
‘पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री का होऊ नये? त्या राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत का?’ असा प्रश्न ओबीसी नेत्याने उपस्थित केला. एवढेच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशी थेट मागणीच केली आहे. ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रेची सांगता बीडच्या गेवराई तालूक्यातील वडगाव ढोक येथे झाली. यावेळी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आपली मतं मांडताना मोठी मागणी केली.
पंकजा मुंडे यांना संघर्षाचा वारसा आहे. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या राज्याचे प्रतिनिधित्व करू शकतात. ओबीसींचे 100 आमदार निवडून आले तर पंकजा मुंडेंनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी वाघामारे यांनी केली. तर प्रीतम मुंडेंना देखील प्रतिनिधित्व द्यावे लागेल असे ते म्हणाले. शिवाय लक्ष्मण हाके आणि आपण विधानसभेची निवडणूक लढणार नाही असेही वाघामारे यांनी स्पष्ट केले. आम्हाला ओबीसींचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचे आहेत. आम्हाला ओबीसी समाज जागा करायचा आहे, असेही वाघमारे यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडे, छगन भुजबळ, वडेट्टीवार यांच्यासारखे ओबीसी नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ओबीसींचे 100 आमदार झाले तर प्रीतम मुंडेंना देखील प्रतिनिधित्व द्यावे लागेल. 54 टक्के असलेल्या समाजाला सर्व पक्षांनी प्रतिनिधीत्व दिले पाहिजे. आम्हाला ओबीसीचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचे आहेत. आम्हाला ओबीसी समाज जागा करायचा आहे, असे वाघमारे यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी निवडणुकीत ओबीसींचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
भाजपमधूनही झाली होती मागणी
जून २०२२ मध्ये एकीकडे शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. आणि दुसरीकडे पुन्हा पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्या असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी भर सभेत काढला होता. बीडच्या आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर पंकजाताई भावी मुख्यमंत्री.. पंकजाताईला मुख्यमंत्री करा… अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे खळाळून हसल्या होत्या. ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी वाढते. तुमच्या अशा कृत्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतो,’ असं त्या म्हणाल्या होत्या.