जयेश गावंडे
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात शेवटचे मतदान राज्यात पार पडलं. राज्यातील 48 मतदारसंघात काही ठिकाणी ‘हायव्होल्टेज’ लढती झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील या मतदारसंघावर देशातील मोठे नेते लक्ष ठेवून होते. प्रचार सभातून या मतदारसंघात वातावरण ढवळून निघाले होते. या मतदारसंघाचा निकाल नेमका काय लागणार यावर राज्यातील राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. प्रतिष्ठेच्या या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपली. दिग्गज नेत्यांसह राज्यातील नेत्यांच्या सभांनी निवडणुकीत रंगत आणली. सभांमधून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. अनेक ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नेत्यांच्या लढतीकडे माध्यमांसह सर्वांचे लक्ष होते. आता निवडणूक संपली असली तरी प्रतीक्षा आहे अंतिम निकालाची. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. अनेक मतदारसंघात झालेल्या काट्याची लढतीत कोण आपली प्रतिष्ठा वाचविणार कोण गमावणार हेही पाहावे लागणार आहे.
फाटाफुटीचे राजकारण
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन वेगवेगळे पक्ष तयार झाले. एकमेकांचे कट्टर समर्थक असलेले नेते एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. त्यामुळे राज्यातील निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत झालेला निवडणुकीचा सामना रंगतदार तेवढाच प्रतिष्ठेचा झाला.
राज्यातील ‘या’ मतदारसंघावर देशाचं लक्ष!
देशात आणि राज्यात काही मतदारसंघाची चर्चा झाली. यामध्ये बारामती मतदारसंघात साहेब विरुद्ध दादा असा सामना रंगला होता. राष्ट्रवादीतील दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. तर अमरावती मतदारसंघातही नवनीत राणा सह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली. बच्चू कडू यांनी येथील निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली. सभेच्या मैदानासाठी कडू यांनी हायव्होल्टेज ड्रामा केला. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. या मतदारसंघावर राज्यासह देशाचं लक्ष लागून होतं. तर नागपूर मध्ये नितीन गडकरी यांच्यासाठी लढत अतिशय प्रतिष्ठेची ठरली.
अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात नाना पटोले हेही ठाण मांडून होते. तसंच मावळ, शिरूर, पुणे मधील लढती चर्चेत राहिल्या. तर कल्याण मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासह प्रसिद्ध सरकारी उज्ज्वल निकम यांनीही राजकारणात उडी घेतली. मुंबईतील सर्वच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रावेर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या मतदारसंघात सामना झाला.
सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. तर कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनीही निवडणूक लढविली आहे. यासह सुधीर मुनगंटीवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट करून राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले. येथील लढतही लक्षवेधी ठरली. बीड मध्ये पंकजा मुंडे तर जालना मध्ये रावसाहेब दानवे यांच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. तर संभाजीनगर मध्ये चौरंगी लढत झाली. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पक्ष फुटी, स्थानिक समस्या, आदी विषयांवरून लढतीत रंगत आली होती.
Maharashtra Lok Sabha : टक्केवारी ‘कट टू कट’; नेत्यांची वाढली धडधड
भाजपकडून दिग्गज मैदानात!
राज्यात दोन पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणूक झाली. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत झाली. भाजपचे अनेक दिग्गज राज्यात ठाण मांडून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्या वाढत्या सभा चर्चेचा विषय ठरल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभांची शंभरी पार केली. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रियंका गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांनीही सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. धुरळा आता खाली बसला आहे परंतु 4 जून रोजी कोणाचे कष्ट फळाला आले हे स्पष्ट होणार आहे.