Education Department : जाजावंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके यांना नुकताच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी पाच सप्टेंबरला त्यांना सरकारच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी हे गाव म्हणजे अतिशय दुर्गम व आदिवासी भागात आहे. माओवादग्रस्त भाग म्हणून हा परिसर ओळखला जाते. या गावात जायला नीट रस्तेसुद्धा नाहीत. मूलभूत सुविधा नाहीत. अशा ठिकाणी 2010-11 या वर्षी मांतय्या बेडके हे शिक्षक म्हणून रुजू झालेत. ते ज्या वेळेस शाळेत रुजू झालेत, त्यावेळी येथील विद्यार्थ्यांची संख्या केवळ सात होती. यातील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ तीन ते चार होती. उर्वरित विद्यार्थी आपल्या पालकांसोबत मिळेल त्या कामावर जाणारे होते.
प्रतिकूल परिस्थितीत मांतय्या बेडके यांनी अथक मेहनत घेतली. शाळेत विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण केली. ते स्वतःही विद्यार्थ्यांसाठी सतत उपलब्ध राहात होते. त्यांनी या शाळेचे रुपच पालटले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आता या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 140 पर्यंत पोहोली आहे . मांतय्या बेडके हे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी 30 विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्याही शिक्षणाचा खर्च उचलला आहे. शालेय परिसरामध्येच त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांनी या गावातीलच काही पालकांचे व आपल्या मित्रपरिवाराचे सहकार्य घेतले आहे.
साक्षरतेसाठी प्रयत्न
गावात फिरत असताना आणि शाळेमध्ये येत असताना पालकांच्या निरक्षरतेची कल्पना मांतय्या बेडके यांना आली. त्यामुळे त्यांनी निरक्षर पालकांनाही साक्षर करण्याचा वसा उचलला. त्यासाठी त्यांनी दोन स्वयंसेवकांची मदत घेतली. आता गावातील जवळपास 150 प्रौढांना त्यांनी साक्षर करण्यात यश मिळवले आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या जाजावंडी येथे त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागचा गौरव यामुळे वाढला आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम, आदिवासी, माओवादग्रस्त भागामध्ये त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली आहे. नुकताच त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे मांतय्या बेडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सध्या काही चुकीच्या लोकांमुळे शिक्षकांबद्दल समाजात संतापाची लाट आहे. अशात गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यामध्ये एकनिष्ठेने व समर्पित भावनेने आपले वेगळेपण जपणारे बेडके खरच आदर्श शिक्षक ठरले आहेत. मांतय्या बेडके यांनी आपल्या कार्यशैलीमुळे समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे . त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे.