Omar Abdullah To Become CM : जम्मू आणि काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसला यश मिळाले आहे. ओमर अब्दूल हे जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कलम 370 हटल्यानंतर जम्मू आणि काश्मिरात प्रथमच विधानसभेची निवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत भाजपला (BJP) यश मिळाले नाही. या अपयशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी राजीनामा दिला आहे. रैना निवडणुकीतही पराभूत झाले आहेत.
निवडणुकीत भाजपने 29 जागा जिंकल्या आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (PDP) तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवार यांच्या आम आदमी पार्टीने येथे खाते उघडले आहे. ‘आप’ला एका जागेवर विजय मिळाला आहे. याशिवाय जेसीपी, माकपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. सात अपक्षांना विजय मिळाला आहे. जम्मू काश्मिरच्या विधानसभेत एकूण 90 जागा आहेत. बहुमतासाठी 46 जागा मिळविणे गरजेचे आहे.
मुफ्ती हरल्या
माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. निकालानंतर नॅशनल कॉन्फ्रन्स सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसजवळ सहा जागा आहेत. त्यामुळे नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस एकत्रितपणे सरकार स्थापन करतील असे सांगण्यात येत आहे. यात ओमर अब्दूला मुख्यमंत्री होतील. देशातील अनेक राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी जम्मु काश्मिरात नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला होता.
निवडणूक निकालानंतर फारूख अब्दूला यांनी पक्षाच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. भाजपने निकालांनंतर जनतेचा निर्णय मान्य असल्याचे नमूद केले. मतमोणीला सुरुवात झाल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास ओमर अब्दूला यांनी स्वत:चे फोटो ट्विट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी हवन करीत विजयासाठी प्रार्थना केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. आनंदी मुद्रेत त्यांनी विजय मिळेल असे लिहिले. महत्वाच्या असलेल्या श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघातून भाजपच्या बलदेव राज शर्मा यांनी विजय मिळविला. मात्र तरीही भाजपला समाधानकारक यश मिळाले नाही.
दहा वर्षांनंतर..
दहा वर्षांनंतर लोकांनी बहुमताचा कौल दिला आहे. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू-काश्मीरमध्ये आमचं सरकार म्हणजे पोलिस राज नसेल. लोकांचं राज्य असेल. तुरुंगात असणाऱ्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यामांना स्वातंत्र्य असेल. हिंदू व मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पु्न्हा मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष सोबत उभे राहतील, असे फारूख अब्दूल्ला यावेळी म्हणाले.