Naresh Mhaske : शिवसेना (शिंदे गट) संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी खासदर श्रीकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनाच केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी काही खासदार व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. खा. शिंदे यांचे निकटवर्तीय तथा खासदार नरेश म्हस्के यांनी तर पत्रकार परिषद घेत ही मागणी जाहीरपणे करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण केला होता. मात्र म्हस्के यांच्या दबावात न येता एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद बहाल केले आहे.
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे सलग तीनवेळा मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. शिवाय, ते तरूण नेतृत्व आहेत, त्यांचे कामही चांगले आहे. संसदेतही त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. तसेच, श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी भाजपदेखील अनुकूल होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी खासदार व आमदारांचा दबाव झुगारून, पक्षात ज्येष्ठ खासदार असलेले प्रतापराव जाधव यांचेच नाव भाजप नेतृत्वाकडे पुढे पाठवले.
घराणेशाही टाळली
श्रीकांत शिंदे हे तीनवेळा निवडून आलेले आहेत, तर प्रतापराव जाधव हे चारवेळा निवडून आलेले आहेत. तसेच, ते विदर्भातील शिंदे सेनेचे एकमेव खासदार व ज्येष्ठ नेते आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली गेली असती तर, एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच घराणेशाहीचा आरोप झाला असता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीचा आरोप देखील टाळला आहे.
खासदार बारणे यांची नाराजी
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना केंद्रात स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून संधी देताना, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि पक्षाबाहेरदेखील एक महत्वाचा संदेश दिलेला आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटाचे मावळ चे खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. तशी तयारी देखील बारणे यांच्याकडून झालेली होती. परंतु, शिंदे यांनी बारणेऐवजी प्रतापराव जाधव यांना संधी दिली. यामुळे बारणे यांचीच नाराजी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.