Makeover Of NCP : लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक योग्य चाललीच नाही. महायुतीला महाराष्ट्रात कमाल दाखविता आली नाही. त्यामुळे योग्य टायमिंग साधत अनेकांनी त्याचे खापर दादांवर फोडण्याचा प्रयत्न केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादीने झेप घेण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राजकीय रणनीतीकार नरेश आरोरा दादांना मदत करणार आहेत. त्यातून राज्यभरात दादांचा उदो उदो व्हावा, यावर भर दिला जाणार आहे. त्यादृष्टीने दादांचा नवा डॅशिंग लूक, दादांचे दौरे, दादांची बोलण्याची स्टाइल असे सारे काही निश्चित करण्यात आले आहे.
दादांच्या राष्ट्रवादीला लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत झेप घेता आली नाही. विधान परिषद निवडणुकीतही कमाल दाखविता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीतीकार नरेश अरोरा यांना दादांचे सल्लागार म्हणून टीममध्ये घेतले आहे. अरोरा हे निवडणुकीपर्यंत दादांच्या घड्याळीला वेळोवेळी चावी भरणार आहेत. अरोरा हे डिझाइन बॉक्स या कंपनीचे संचालक आहेत. राजस्थानमध्ये (Rajasthan) अरोरा यांनी काँग्रेससाठी (Congress) व्यापक काम केले. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या इमेज बिल्डिंगचे काम अरोरा यांनी केले.
कर्नाटकमध्येही काम
राजस्थान व्यतिरिक्त नरेश अरोरा यांनी कर्नाटकमध्येही (Karnataka) काँग्रेससाठी राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी काम केले. त्यानंतर काँग्रेसला कर्नाटकमध्ये यश मिळाले. शिवकुमार उपमुख्यमंत्री झालेत. त्यामुळेच कदाचित दादांनी सल्लागार म्हणून अरोरा यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे. सल्लागार म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर अरोरा यांनी दादांना काही टिप्स दिल्या आहेत. त्यानुसार आगामी काळात दादांचा लूक असेल. दादा त्याच हिशोबाने भाषणांमध्ये बोलतील. त्याच हिशोबाने राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करेल असे दिसत आहे.
हिंदुत्व स्वीकारणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा यांची प्रतिमा ‘सॉफ्ट हिंदुत्त्ववादी’ असावी अशी गरज दिसत आहे. तसा सल्ला अरोरा यांनी दादांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दादा हिंदुत्वाकडे झुकलेले दिसू शकतात. अरोरांच्या सल्ल्यानुसार दादा आता राज्यभर दौरा करणार आहेत. दादांच्या दौऱ्याचा ‘रोडमॅप’ही पक्षाच्या फायद्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. दादा राज्यात अर्थमंत्री आहेत. त्यांचीच विधानसभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. त्यामुळे या योजनेच्या प्रचारात दादांचे नाव आघाडीवर दिसणार आहे. राज्यातील सगळ्या कामांचे क्रेडिट केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळणार नाही, याची काळजीही राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे.
नारीशक्तीवर भर
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) निवडणूक जिंकण्यासाठी महिला मतदारांचा फॅक्टर खूपच महत्वाचा ठरला. हाचा फार्मूला यंदा महाराष्ट्रात वापरला जाणार आहे. त्यासाठी सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना लागू करीत आहे. एसटी प्रवासात आधीच महिलांना सवलत देण्यात आली आहे. मुलींच्या शिक्षणाचा भार सरकार उचलणार आहे. अलीकडेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दादांची राष्ट्रवादीही आता नारीशक्तीवर भर देणार आहे.
खास वेशभूषा
नरेश अरोरा यांच्या सल्ल्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या संपूर्ण निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान ‘पिंक’ रंगाचा वापर करणार आहे. त्यानुसार दादांच्या अंगावर यापुढे गुलाबी रंगाचे जॅकेट दिसणार आहेत. बारामती (Baramati) येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात दादा गुलाबी जॅकेटमध्ये दिसले. अर्थसंकल्प सादर करतानाही दादांनी याच रंगाचे जॅकेट वापरले होते. सध्या दादांसाठी सुमारे 12 ते 15 नवीन जॅकेट मागविण्यात आले आहेत. बारामतीच्या सभेच्या ठिकाणीही गुलाबी रंगाचा वापर जास्त होता. गुलाबी रंग महिलांशी जोडण्यात येतो. त्यामुळेच कदाचित दादांसाठी या रंगाची अरोरा यांनी निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्यास दादांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी (Chief Minister) पुढे येईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सध्या एकच ध्येय आहे, महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री दादांना बनविणे.