Bhandara-Gondia Politics : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप नेते, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. त्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. महायुती या नात्याने त्यांचा पराभव होणे, ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. सुनील मेंढे यांच्या प्रचार यंत्रणेत आमच्यात समन्वय नव्हता, नियोजनाचाही अभाव होता, अशी कबुली भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.
माजी खासदार सुनील मेंढे यांना ‘राम’ म्हणून स्वतःला लक्ष्मण म्हणवून घेणाऱ्या भंडारा विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत उपरोक्त प्रतिक्रिया दिली. भंडारा विधानसभा मतदारसंघात सुनील मेंढे यांचे मताधिक्य घटले. यावरून सुरू टिका टिप्पणी केली जात आहे. यासंदर्भात नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली अंतर्गत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील मेंढे यांच्या पराभावाची मिमांसा करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. सुनील मेंढे यांच्या पराभवात नाना पटोले यांचे काहीच योगदान नाही. त्यामुळे त्यांनी मोठेपणाचा आव आणू नये. भंडारा विधानसभा मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणला.अनेक प्रकल्प सुरू केले, काही सुरु होत आहेत. नाना पटोले यांच्यापेक्षा आपण आणलेला विकासनिधी आणि केलेली कामे अधिक आहेत.
पटोलेंनी कृषी विद्यालय आणले, मात्र त्यासाठी अजूनही जागा मिळवू शकले नाहीत. त्यांनी किती निधी आणला आणि मतदारसंघाचा काय विकास केला, हे दाखवावे, असे आव्हान भोंडेकर यांनी दिले. निवडणुकीमध्ये काँग्रेसने जाती, धर्माबाबत अपप्रचार केला. संविधान बदलण्याचाही मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला, असा आरोप भोंडेकर यांनी केला आहे.
PM Modi Oath Ceremony : प्रफुल पटेल उद्या घेणार मंत्रिपदाची शपथ !
‘रामा’चा वनवास ‘लक्षणा’ला भीती..
सुनील मेंढे यांना राम म्हणून स्वतःला लक्ष्मण म्हणवून घेणाऱ्या भोंडेकरांनी ‘जेथे जेथे तुम्ही, तेथे तेथे आम्ही’असा संकल्प केला आहे. आता रामाला वनवास झाल्यानंतर लक्ष्मणाचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान भंडारा विधानसभेत मेंढे यांची 22,835 मते घटली आहे. हे घटलेले मताधिक्य भोंडेकराना घातक ठरु शकते, अशी ही चर्चा आता होऊ लागली आहे. वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून रामाप्रमाणे लक्ष्मणालाही वनवास भोगण्याची वेळ येऊ नए, इतकेच..