आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आला आहे. पंतप्रधान आज (दि.१३) मुंबईत दाखल होणार असून तब्बल 29 हजार 400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये काही प्रकल्प केंद्र सरकारचे तर काही राज्य सरकारच्या अख्त्यारितील आहेत. अवघ्या दोन महिन्यांवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आल्या असताना मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सायंकाळी 5:30 च्या सुमारास पंतप्रधान गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. त्यानंतर, सायंकाळी सातच्या सुमारास जी -ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे आणि बोरिवली हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. त्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे घोडबंदर रोड या दरम्यान थेट संपर्क निर्माण होईल. प्रवासाच्या वेळेत जवळपास 1 तासाची बचत होईल.
या भेटीदरम्यान कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची तसेच नवी मुंबईमध्ये तुर्भे येथे गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलच्या कामाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हे टर्मिनल स्थानिक जनतेसाठी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 च्या विस्तारित भागांचे तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग दरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे.
महायुतीचा विजय अन् पंतप्रधानांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पूर्वनियोजित आहे. पण विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजयाची नोंद करणे आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांचे मुंबईत आगमन होणे. ही बाब मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसाठी विशेष ठरणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
मुंबई दौऱ्यात जवळपास 5 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील तरुणांना कौशल्य सुधार आणि उद्योगांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. तसेच बेरोजगारीची समस्या सुटावी, असा उद्देश्य आहे.
आयएनएस टॉवरचे उद्घाटन
वांद्रे -कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीला (आयएनएस) भेट देऊन तेथील आयएनएस टॉवरचेही पंतप्रधनांच्या हस्ते उद्घाटन होईल. वांद्रे -कुर्ला संकुलात ही इमारत नव्याने उभारण्यात आली आहे. वर्तमानपत्र उद्योगासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे.