BJP & Congress पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे व भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात लढत आहे. मात्र काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांनीदेखील ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. कुणबी मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे जिचकार यांच्यावर भाजपच्या बऱ्याच आशा अवलंबून आहेत. मात्र जिचकार यांच्या अर्जावर आलेल्या आक्षेपांनंतर भाजपमध्येच चिंता वाढली होती. अखेर जिचकारांना दिलासा मिळाला व कोहळेंच्या मनावरील मोठे दडपण दूर झाले.
राजेश गोपाळे यांचा आक्षेप
जिचकार हे सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार राजेश गोपाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला. त्यानंतर छाननी समितीसमोर सुनावणी झाली. जिचकार यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. गुरुवारी छाननी समितीने त्यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले आणि जिचकार यांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. कोहळे यांना अशा प्रकारे दिलासा मिळाला आहे.
पश्चिम नागपुरात काँग्रेसपुढे सर्वांत मोठे आव्हान बंडखोरी रोखण्याचे आहे. नरेंद्र जिचकार यांनी काँग्रेसची मते घेतली तर सुधाकर कोहळे यांना थेट फायदा होऊ शकतो. विकास ठाकरे आणि जिचकार यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनाच पुढे यावे लागणार आहे. जिचकार यांनी अर्ज मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही. तसे झाले तरीही जिचकार स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे विकास ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
विशेष म्हणजे सुधाकर कोहळे यांच्यासाठी आम्ही सगळे एकत्र मैदानात उतरू असे आता पश्चिम नागपुरातील काही नेते म्हणत आहेत. मात्र पश्चिम नागपूरच्या भाजपमध्ये उभी फूट पडलेली सर्वांनी बघितली. नरेश बरडे, दयाशंकर तिवारी हे दोन नेते कोणत्याही परिस्थितीत सुधाकर कोहळे यांच्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोहळेंना देखील नवख्या मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्याची कसरत करावी लागणार आहे.
Assembly Election : खाजगी जागेत झेंडे लावले तर पक्ष येणार अडचणीत
बंडखोर
पश्चिम नागपुरातील बंडखोरांची तसेच नाराज पदाधिकाऱ्यांची फडणविसांनी समजूत काढली आहे. मात्र, त्याचा किती उपयोग होतो हे प्रत्यक्ष प्रचाराच्याच वेळी दिसेल. कारण कोहळे यांना उमेदवारी जाहीर होताच नरेश बरडे आणि दयाशंकर तिवारी यांनी थेट भूमिका मांडली होती. कोहळे यांच्या उमेदवारीवर आपण कमालीचे नाराज असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियांमधून स्पष्टपणे सांगितले होते.