Chatrapati Sambhaji Maharaj statue : मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर बुधवारी 28 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीचे नेते तेथे पोहोचले. त्याठिकाणी राणे समर्थक आणि शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी झाली. काही काळ तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आक्रमक झाले होते. त्यांच्या एका वक्तव्यावरून वादही झाला. पण आता ‘घरातून खेचून मारुन टाकेन’ हे शब्द आपले नसल्याचे सांगत राणेंनी घुमजाव केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली. आम्ही तिथे पाहणी करण्यासाठी गेलो होतो. पाहणी करून परतत असताना ठाकरे गटाचे लोक वाटेत आमच्या अंगावर आले. दरम्यान समोरुन घोषणाबाजी सुरु होती. ठाकरे गटाने अतिरेक केला म्हणून आम्ही 2 तास त्यांना जाऊ दिलं नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं.
‘घरातून खेचून मारुन टाकेन’ या वक्तव्यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, मी असं काही म्हटलंच नाही. मारेन शब्द माझा नाही. बाहेर जाऊ देणार नाही असं मी म्हणाले. मी असा का बोलेन? तिथे बरेच मार्ग होते. जवळ समुद्र होता, कठडा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत. संपूर्ण गोंधळ सुरु असताना जयंत पाटील माझ्याशी बोलायला आले. मी त्यांना म्हटलं थोडं थांबा. मार्ग निघेल. मात्र कुणी मस्ती केली तर मी मागे हटत नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
Nagpur : वडेट्टीवार म्हणतात, शिंदे गटाच्या आमदाराला आली मस्ती !
आम्ही त्यांचा स्वाभिमान जोपासला
विधानसभा निवडणुकीवर या सर्व गोष्टींचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवरायांचा पुतळा कुणी पाडलेला नाही. तो दुर्दैवाने पडला आहे. पुतळा कशामुळे पडला आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल. संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल. सरकार लवकरात लवकर पुतळा देखील उभारेल. माझं सगळ्यांशी बोलणं झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. आम्ही फक्त पोटापाण्यासाठी हिंदुत्व आणि महाराजांच्या नावाचा उपयोग नाही केला. आम्ही त्यांचा स्वाभिमान जोपासला, असा टोला देखील नारायण राणे यांनी ठाकरेंना लगावला.
तो पर्यंत ठाकरे जंगलातच होते
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पाहिली नाही. आम्ही शिवसेना नावारुपाला आणल्यानंतर हे आले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे जागे झाले. तोपर्यंत फोटो, जंगल सफारी करत होते. ठाकरे माणसात फार उशीरा आलेत. ते जंगलातच होते, असा टोलाही नारायण राणे यांना लगावला. देशाच्या, राज्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरेंसारखं मातोश्री एके मातोश्री असं एका गल्लीत आम्ही मर्यादित नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना हे दोन दिवस फक्त मंत्रालयात गेले. आमच्या प्रत्येक योजनेवर टीका करतात. तुम्ही काय केलं ते सांगा?, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.