छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते भेट देण्यासाठी पोहोचले होते. त्याच वेळी खासदार नारायण राणेही राजकोटवर आले. यावेळी दोन्ही गटात चकमक झाली.
नारायण राणे आक्रमक झाल्याने गडावरच राडा झाला. घरातून खेचून एकएकाला मारून टाकेन अशी धमकी राणे यांनी दिली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले त्यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशीच अडवलं.
राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे आपली प्रतिक्रिया दिली. कोणीही घोषणाबाजी करायची नाही. पोलिसांना सहकार्य करा, पण यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तर परवानगी दिल्यानंतर मी एकेएकाला बघतो. रात्रभर घरातून खेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय विडेट्टीवार, जयंत पाटील हे सर्व नेते एकत्रीत त्याच वेळी पोहोचले. त्यामुळे गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजुंनी घोषणाबाजी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. गडावर तणाव निर्माण झाला. त्यात खासदार नारायण राणे यांचा संताप अनावर झाला. राणेंनी यावेळी पोलीस अधिक्षकांनाच धारेवर धरले.
महाविकास आघाडीचे नेते अडकून पडले
गडावर तणाव निर्माण झाल्यानंतर राजकोटवर गोंधळ वाढला. राणे निघून गेले. पण त्यांचे कार्यकर्ते गडाच्या दरवाज्यावर अडून राहीले. आतमध्ये महाविकास आघाडीचे नेते अडकून पडले होते. त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दिला जात नव्हता. या सर्व प्रकरणात जयंत पाटील यांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर तेवढीच आक्रमकता शिवसेना ठाकरे गटाने ही यावेळी दाखवली. त्यामुळे वातावरण स्फोटक झाले होते.