महाराष्ट्र

Congress : पटोले म्हणाले, ‘मुख्यमंत्री निवडणूक आयोगाचे वकील’

Nana Patole : मारकडवाडीची वकिली करण्याचा सल्ला; ‘भारत जोडो’ यात्रेवर कारवाई का केली नाही?

Winter session : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वपक्षियांकडून टार्गेटवर आहेत. त्यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. पण या संपूर्ण परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात मात्र ते कुठेही कमी नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे वकील असल्याची टीका त्यांनी गुरुवारी केली. आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारडकवाडीची वकिली करावी, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्याचवेळी भारत जोडो यात्रेत असामाजिक तत्वं सामील होती तर, तेव्हाच कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

विधानसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीच्या विजयावर जनतेचा विश्वास नाही. हे सरकार आपण दिलेल्या मतांच्या जोरावर निवडून आलेले नाही. निवडणुकीत घोटाळा करून निवडून आले आहे. 76 लाख मते कशी वाढली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिले नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले.

घोटाळा

विधानसभा निवडणुकीत कुठलाही घोटाळा झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत आयोगाची भूमिका संशयास्पद राहिली आहे. मतदारांची नावे वगळणे, नवीन नावांचा समावेश करणे यातील गैरकारभार व मतांची टक्केवारी यावर शंका उपस्थित केली जात आहे. रात्रीच्या अंधारात 76 लाख मते कशी वाढली, याची विचारणा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. पण अद्याप आयोगाने त्यावर उत्तर दिलेले नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री का उत्तर देतात?

मारकवाडीच्या जनतेने याविरोधात आवाज उठवला. पण सरकारने पोलीसांच्या मदतीने त्यांना मॉक पोलिंग घेऊ दिले नाही. आता अनेक ग्रामसभा बॅलेटपेपरवरच निवडणुका घ्या असे ठराव करत आहेत. जनतेच्या या भावनांचा आदर केला पाहिजे. तो होताना दिसत नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे अपेक्षित आहे ती मुख्यमंत्री का देत आहेत, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.

Ramesh Chennithala : अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा !

भारत जोडोची आठवण का आली?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 4 हजार किलोमीटरची पदयात्रा काढून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला व डरो मत चा नारा दिला. पण या यात्रेत असामाजिक तत्वे होती असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत. त्यांना आता त्याची आठवण होण्याची गरज काय? जर भारत जोडो यात्रेत असामाजिक तत्वे होती तर राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारने काय केले? भाजप सरकारने त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या जीवाला धोका होता. तरीपण त्यांनी तमा बाळगली नाही. ज्या यात्रेची जगाने दखल घेतली त्या यात्रेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!