Nana Patole : परवा अधिवेशनात उद्धव ठाकरे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर लगेच त्याची राजकीय चर्चा माध्यमांवर सुरू झाली. माध्यमांनी राजकीय चर्चा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडावे, त्या प्रश्नांवर चर्चा करावी. या अधिनेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली. यावर चर्चा होत नाही, तर भलत्याच विषयांवर चर्चा केली जाते. हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर ओबीसी नेत्यांची एक बैठक पार पडली. याबाबत पटोले यांना विचारले असता, मीसुद्धा ओबीसी आहे. पण मला त्या बैठकीबद्दल काहीही माहित नाही. त्यामुळे त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. छगन भुजबळ अजित पवार यांच्यासोबत गेले. ते महायुतीमध्ये आहेत. त्यांना मंत्रिपद का नाकारलं, हे त्यांचं ते बघत बसतील, असे ते म्हणाले.
डिमोशन
काल रात्री उशीरा झालेल्या खातेवाटपात काही नेत्यांचे डिमोशन झाले आहे. मलाईसाठी काय काय झालं असेल, त्यावर मी बोलणार नाही. जो काही गोंधळ सुरू आहे, तो सगळी जनता बघत आहे. स्वतः अजित पवार जर म्हणत असतील की मंत्रीमंडळात काही जण नाखुश आहे, तर आणखी काय पुरावा पाहिजे. यातून या सरकारची काय गडबड चालली आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे.
मागील वेळेस 20 हजार कोटीच्या तुटीचं बजेट अजित पवार यांनी मांडलं होतं. आता येणारे पुढील बजेट आणखी किती तुटीचे असणार, हे बघावे लागणार आहे. त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर देऊन हे लोक महागाई आणखी वाढवणार. निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात आले. जनतेच्या कृपेने हे लोक सत्तेत आलेले नाहीत. महागाई, शेतकरी यांसाठी काय करणार, अनुशेष कशावरून काढणार की मूठभर लोकांना फायदा दिला जाईल, हेसुद्धा बघावे लागणार आहे.
विरोधात ताशेरे
CAGचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी न मांडता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आला. कारण सरकारच्या विरोधात ताशेरे ओढल्याचं त्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बघवली जात नाही. औषधी नाहीत, पदे रिक्त आहेत, जिकडे तिकडे भ्रष्टाचार माजला आहे. रुग्णवाहिकांचीही स्थिती वाईट आहे. कोरोनाच्या नंतर आरोग्य सुविधांच्या बाबतीत स्थिती चांगली होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाने केली होती. नव्हे तसा संदेश कोरोनाने दिला होता. पण आज आरोग्य विभागच आजारी झालेला आहे, असे नाना पटोले म्हणाले.