Lok Sabha Election : उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नकली संतान’ म्हटले आहे. कुणाच्या मुलाबद्दल, वडिलांबद्दल असं बोलणं योग्य नाही. बाळासाहेबांना वरून आणावे लागेल, उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासावा लागेल. एवढ्या खालच्या दर्जावर जर प्रधानमंत्री बोलत असतील तर काय म्हणावे? नरेंद्र मोदी म्हणून हे ठीकच आहे, मात्र पंतप्रधान म्हणून अतिशय वाईट आहे, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.
निवडणूक आयोगाला जाणीव करून देऊ
शुक्रवारी (ता. 10) नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, रवींद्र वायकरांच्या बाबतीत ईडी आणि सीबीआयचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येते. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाला पारदर्शकपणे काम करावे लागेल. जी टक्केवारी होती, ती 11 दिवसानंतर आकडेवारी जास्त कशी होऊ शकते? निवडणूक आयोगाने पारदर्शक व्हावे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे निवेदन देऊन जाणीव करून देणे आमचे कर्तव्य आहे,
नवीन रस्ते महामंडळावर टिका करताना पटोले म्हणाले, 25 हजार कोटींच्या वर रस्ते बांधले जाणार आहेत. हे सगळे कर्ज घेऊन होणार आहे. मागच्या काळात डांबरी रस्ते HAM अंतर्गत तयार कले. यावेळी मूठभर ठेकेदारांसाठी बँकेचे हजारो कोटी रुपये घेऊन रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 100 टक्के पैसे कंत्राटदाराला द्यायचे आहेत. त्यासाठी ब्रिजेश दीक्षित यांना तिकडे पाठवले आहे. बँकेची तिजोरी लुटून मूठभर कंत्राटदारांसाठी सरकार काम करत आहे.
साड्या वाटपात भ्रष्टाचार..
महिलांना साड्या देण्यात आल्या. त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार केला. विधानसभेत मुद्दा मांडू आणि वेळप्रसंगी कोर्टातही जाऊ. पूर्ण भारतीय जनता पक्षच पागल झाला आहे. कारण त्यांची सत्तेतून बाहेर जायची वेळ आली आहे. नवाज शरीफ यांच्याकडे जाऊन बिर्याणी खाऊन आले आणि आता निवडणुकीच्या वेळी हिंदू-मुस्लिम करून राहिले. त्यांनी लक्षात ठेवावे की, आता हिंदू-मुस्लिम कार्ड चालणार नाही, असा इशारा पटोलेंनी भाजपला दिला. आमचे सरकार आल्यावर राम मंदिर तर चांगले करू मात्र शंकराचार्यांनी जी भूमिका घेतली, त्यांच्या माध्यमातून राम मंदिर शुद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत विचारले असता, भाजप नेते डिस्टर्ब झाले आहेत. आधी हेमंत बिस्वा तर बोललेच मात्र आता पंतप्रधानदेखील तेच बोलले. त्यावरून यांची मानसिकता जनतेच्या लक्षात आली आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांची शरद पवारांना ऑफर..
‘शरद पवारांना पंतप्रधानपदाची ऑफर’, याबाबत विचारले असता, पहिले त्यांनी स्वतः घर तोडले, नंतर ब्लॅक मेल केले. तरीही काही साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे आता नरेंद्र मोदींनी मान्य करावे की आता ते सत्तेत येणार नाहीत. याचाच अर्थ असा की, आमचा दावा खरा ठरतोय, असेही नाना पटोले यांनी सांगितले.