Nagpur winter session : भाजप सत्तेत आले तर संविधान बदलणार, असा प्रचार करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी केल्या. भाजपने काँग्रेसवर फेक नरेटिव्ह पसरविल्याचा आरोप केला होता. मात्र आता काँग्रेसने भाजपवर फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपविण्यासाठी भाजप फेक नरेटिव्ह पसरवत आहे’, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. अमित शाहांचे हे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
नौटंकी
विधानभवन परिसरात पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधारी भाजपने लोकसभेला आखाडा बनवले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. देशाच्या एकतेसाठी काँग्रेस पक्षाचे दोन महत्वाचे नेते शहीद झाले. भाजपाने देश अदानीला विकण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. सरकार अदानीला वाचवण्यासाठी नौटंकी करत आहे. मोदी अदानींचे काय संबध आहेत ते जगजाहीर आहे. काँग्रेसने अदानी प्रश्नावर चर्चेची मागणी केल्याने सत्ताधारी भाजपाकडून खोट्या कथा रचून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला बदनाम केले जात आहे. राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी किती घाबरतात हे यावरून स्पष्ट होते, असंही नाना पटोले म्हणाले.
भारत जोडो यात्रेत नक्षलवादी विचाराच्या संघटना होत्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेंव्हा देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते. त्यांच्याकडे अशी काही माहिती होती तर त्याचवेळी त्यांनी कारवाई करायला हवी होती. कारवाई न करणारे फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री आहेत असे म्हणायचे का. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, राहुल गांधी व भारत जोडो यात्रेची लोकप्रियता भाजपाला सहन होत नाही म्हणून भाजपाकडून असा अपप्रचार केला जातो.
हल्ला
भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध केला.