Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. फेरीवाल्यांसंदर्भात कायदा करीत धोरण आखणे अपेक्षित होते. परंतु 10 वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते. त्यांचे साहित्य जप्त केले जाते. सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावे. तोपर्यंत पावसाळ्यात होत असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील 30 लाख फेरीवाले आजही त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. 2014 मध्ये लोकसभेने फेरीवाल्यांसाठी कायदा मंजूर केला होता. परंतु राज्यात अद्याप ठोस धोरण नसल्यामुळे फेरीवाल्यांना न्याय मिळत नाही. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले जाते. त्यांना अमानुष वागणूक दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.
धोरण ठरवा
विधिमंडळात बोलताना नाना पटोले म्हणाले, पावसाळ्यात फेरीवाल्यांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. 30 लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे. त्यांना कायदेशीर अधिकार देऊन सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आश्वासन दिले. मंगळवारी या मुद्द्यावर चर्चा आयोजित केली जाईल, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या सर्वेनुसार पात्र फेरीवाल्यांना हटवले जाऊ शकत नाही. जर त्यांना हटवले जात असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे नार्वेकर म्हणाले.
फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेसने सरकारला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. राज्यात फेरीवाल्यांची संख्या खूप मोठी आहे.
Maharashtra Assembly : लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल करताना घ्यावी काळजी
फेरीवाल्यांना विक्रीसाठी योग्य जागा नसल्याने ते रस्त्याच्या कडेला फुटपाथवर दुकाने थाटतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांची अडचण होते. अनेक शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. हाताला रोजगार नसल्याने लहान मोठे उद्योग करून फेरीवाले आपले कुटुंब चालवतात. परंतु आता अनेक शहरांमध्ये त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.
फेरीवाले आणि अतिक्रमण संदर्भात राज्य सरकारचे असे कोणतेही ठोस धोरण नाही. स्थानिक स्वराज्य संस्था फेरीवाल्यांवर कारवाई करत असतात. पोलिस प्रशासना कडूनही अनेकदा फेरीवाल्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे या विषयावर आता काँग्रेसने भूमिका घेतली आहे. आमदार नाना पटोले यांनी यासंदर्भात सरकारने धोरण ठरवावे अशी मागणी केली आहे.