महाराष्ट्र

Nana Patole : नोकर भरतीची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांना

BJP : नाना पटोलेंचा गंभीर आरोप; महायुतीने राज्याला वाऱ्यावर सोडले

Mahayuti : कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते. त्याचा भाजपला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही, अशी गंभीर टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महायुती सरकारने राज्याला वाऱ्यावर सोडल्याची टीकाही त्यांनी केली आहे. कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून ते सरकारवर बरसले आहेत. ‘राज्यात जवळपास अडिच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गीय पदांचा अनुशेषही भरलेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपदही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु केली. त्यातून सरकारने सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे,’ असंही पटोले म्हणतात.

कंत्राटी नोकर भरतीला काँग्रेसचा विरोध आहे. ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस नेहमीच तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता, याचाही ते आवर्जून उल्लेख करतात.

निर्णय रद्द केला होता

मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर केले होते. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2023 रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे, असं पटोले म्हणाले.

जनतेला लुटण्याचे काम सुरू

निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही. लगेच एस. टी. महामंडळाने तिकिटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरु झाली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देईल, असे वाटत नाही असेही नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!