महाराष्ट्र

Akola West : विजयाची हमी असल्याने काँग्रेसची पहिली पसंती साजिद खान यांनाच

Congress : दंगलीचा आरोप, पक्षातील हेव्यादाव्यांकडे करणार दुर्लक्ष

Anything To Win : महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे प्राबल्य, तो मतदारसंघ त्या पक्षाकडे असे सूत्र राज्यात आहे. जागा वाटपाचे हेच सूत्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती दोन्हीकडे सारखेच राहणार आहे. अशातच काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ अकोला पश्चिम हा महाविकास आघाडीत काँग्रेसकडेच राहणार आहे. या मतदारसंघातून साजिद खान पठाणे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या जबाबदार नेत्याने ही माहिती ‘द लोकहित’ला दिली. 

भाजपसह जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) अकोल्यात काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे. प्रचंड विरोध असतानाही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. अभय पाटील यांनाच उमेदवारी दिली. अगदी त्याच पद्धतीने काँग्रेस प्रत्येक मतदारसंघात कितीही विरोध असला तरी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच संधी देणार आहे. अगदी दिल्लीतूनच हे आदेश काँग्रेसला आले आहेत. स्थानिक पातळीवर कोणाचा कितीही विरोध असला, तरी जो जिंकू शकतो, अशाच उमदेवाराचे नाव ‘फायनल’ करा, असे थेट सांगण्यात आले आहे.

साजिद यांचे पारडे जड

अकोला पश्चिम मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटणार आहे. या मतदारसंघासाठी साजिद खान पठाण, झिशान सिद्दीकी, रमाकांत खेतान आदी नावे चर्चेत आहेत. खेतान यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीत आपले भाग्य अजमावले आहे. त्यांच्याकडे धनशक्ती आहे. परंतु जनशक्ती कमी आहे. झिशान सिद्दीकी यांच्या जनाधाराबाबतही काँग्रेसला संभ्रम आहे. मात्र साजिद खान पठाण यांच्याबाबत काँग्रेसमधील 90 टक्के नेत्यांचे एकमत आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत साजिद खान यांनी भाजपचे गोवर्धन शर्मा यांना तगडी टक्कर दिली होती. केवळ अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता चित्र पूर्णपणे वेगळे आहे. अकोल्यातील मुस्लिम मतदारांमध्ये साजिद खान पठाण यांच्या नावाची जबरदस्त ‘क्रेझ’ असल्याचे दिसत आहे. विशेषत: मुस्लिम समाजातील तरूण मतदार साजिद यांच्यासोबत आहे.

Akola BJP : संबंध नसलेले ‘पाकिटमार’ घुसले मतदानात

साजिद यांच्या विरोधात अकोल्यात दंगल घडविल्याचा गुन्हा आहे. याच गुन्ह्याचा आधार घेत काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी साजिद यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र प्रदेश काँग्रेसला पाठविले आहे. आरोप कोणाविरुद्धही असून शकतो. भाजपच्या अनेक नेत्यांविरुद्ध दंगल घडविल्याचा गुन्हा आहे. मात्र त्याकडे ज्याप्रमाणे भाजप दुर्लक्ष करते अगदी त्याच धर्तीवर यंदा काँग्रेस साजिद यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येक तक्रारीकडे दुर्लक्ष करणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. भाजपला रोखत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला राज्यातील प्रत्येक जागा जिंकायची आहे. अशातच अकोला पश्चिममध्ये भाजपची मक्तेदारी काँग्रेसला मोडून काढायची आहे. त्यामुळे कोणी कितीही विरोध केला, तरी साजिद यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होऊ शकते, अशी शक्यता काँग्रेसच्या या जबाबदार नेत्याने ‘द लोकहित’शी बोलताना व्यक्त केली.

तिहेरी साथ

लोकसभा निवडणुकीच्या काळात साजिद खान पठाण यांनी काँग्रेसच्या उमदेवारासाठी प्रचंड काम केले. त्यांचे हे काम काँग्रेस नेत्यांच्या मनात भरले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून साजिद यांना लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून उमेदवारी आणि समर्थन मिळणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही साजिद यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शहर प्रमुख राजेश मिश्रा हे अकोला पश्चिमसाठी इच्छूक आहेत. परंतु त्यांना समजाविण्याची आणि मोठी ऑफर देण्याची जबाबदारी शिवसेना पेलणार आहे.

Akola West : उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्याची मागणी

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कदाचित मिश्रा यांना विधान परिषदेवर किंवा महामंडळावरही संधी मिळण्याचे संकेत आहेत. बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून ते ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास त्यांनाही राज्यमंत्रिपदाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या मोबदल्यात मिश्रा आणि देशमुख यांना अकोल्यात साजिद यांना पाठिंबा द्यावा लागू शकतो. या अनुषंगाचे गणित जुळविण्याचे काम सध्या सुरू आहे. बंडखोरी टळावी आणि मतविभाजन होऊ नये यासाठी महाविकास आघाडी ही खबरदारी घेत आहे.

भाजप कमकुवत

अकोल्यात भाजप कमकुवत होत आहे. अकोल्यात गोवर्धन शर्मा असतानाच्या काळातही त्यांच्या समर्थकांना मिळालेल्या वागणुकीमुळे अनेक कार्यकर्ते दुखावले आहेत. भाजपचेच नेते भाजपच्याच विरोधात काम करीत आहेत. उड्डाणपूल, अंडरपास, पूर्णा नदीवरील पूल, मालमत्ता कर वसुली, पीकविमा, अकोल्यातील गुन्हेगारी, विकासाचा अभाव, महापालिकेतील भ्रष्टाचार, भाजपची सत्ता असतानाही मिळालेले टिपू सुलतान हे नाव यावरून महाविकास आघाडीने भाजपला कोंडीत पकडले आहे. यापेक्षाही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गैरहिंदू मतदारांची ताकद प्रचंड वाढली आहे. अशा सर्व समिकरणांची गोळाबेरीज करून काँग्रेस अकोला पश्चिमच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे संबंधित नेत्याने सांगितले.

एमआयएम तयार

साजिद खान पठाण यांच्यासंदर्भात अलीकडेच एआयएमआयएमने देखील अकोल्यात सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यांच्या पाठिशी मुस्लिम समाजातील तरुण ताकदीने उभा असल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास साजिद यांना आपल्यासोबत घेण्यासाठी एमआयएम एका पायावर तयार आहे. जो उमेदवार भाजपला अडीच हजार मतांची टक्कर देऊ शकतो, तो आपल्या कामाचा असल्याचे एमआयएमचा यामागे थेट विचार आहे. त्यामुळे काँग्रेस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणतीही जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही, असेही सद्य:स्थितीत दिल्लीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याजवळ प्रचंड वजन असलेल्या या नेत्याने ‘द लोकहित’शी बोलताना सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!