Screening Before Confirmation Of Candidate : विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. अशात विदर्भात पराभवाचा सामना करावा लागलेली भाजप विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात जपूनच पावले टाकत आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाच्या असलेल्या जिल्ह्यांपैकी अकोला एक आहे. अकोल्यात भाजपने विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वेक्षण केले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळेच चित्र आहे. या मतदारसंघातून भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे प्रतिनिधित्व करतात. आगामी निवडणुकीसाठीही सावरकर यांचेच नाव स्पर्धेत सर्वांत पुढे आहे.
अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे कोण इच्छुक आहेत, याचा आढावा घेण्यात आला. मात्र रणधीर सावरकर यांचे नाव वगळता अन्य कोणाचेही नाव या मतदारसंघातून पुढे आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी या मतदारसंघातून सावरकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही रेसमध्ये नाही. सावरकर यांच्या संदर्भातही भाजपने ‘फिडबॅक’ घेतला. भाजपला त्यांच्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाशी संबंधित अनेकांनी मात्र सावरकर यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचा निसटता विजय
लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात ‘ओव्हर कॉन्फिडन्स’मध्ये होती. महाराष्ट्रासह अकोल्यातही हाच प्रकार होता. केवळ मोदी है तो मुमकीन है, या भरोशावरच भाजपने निवडणूक लढविली. राज्यातील अनेक मतदारसंघात खासदारांनी विकासच केला नव्हता. त्यामुळे विदर्भात महायुतीच्या जवळपास सगळ्यात जागांवर भाजपची पिछेहाट झाली. अकोल्यातही भाजपला मतविभाजनामुळे विजय मिळाला, हे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविली नसती तर भाजपची अकोला लोकसभा मतदारसंघाची जागाही धोक्यात होती. अकोला लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना कोणत्या मतदारसंघातून किती मतदान झाले याचे आकडे तपासण्यात येत आहेत. परंतु अकोला पूर्व मतदारसंघात सद्य:स्थितीत सावरकर यांच्या व्यतिरिक्त कोणतेही नाव प्रबळ दावेदार नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
2014 पासून सावरकर या मतदारसंघाचे आमदार आहेत. अकोला शहरातील काही भाग या मतदारसंघात येतो. अकोट तालुक्यातील कुटासा, चोहट्टा बाजार अकोला पूर्वमध्ये आहे. अकोला तालुक्यातील घुसर, पळसो बुद्रूक, अमरावती मार्गावरील बोरगाव मंजू, कापशी, उमरी बाळापूर, मलकापूरही अकोला पूर्व मतदारसंघात येतो. सावरकर यांनी पूर्णा नदीवर पूल बांधला होता. मात्र हा पूल पुरात वाहून गेला. अकोला शहराला पूर्वी कापशी तलावातूनही पाणी पुरवठा व्हायचा. कापशी तलावाचे पुनरूज्जीवन, खारपाणपट्ट्यातील गावांमधील शुद्ध पेयजलाची व्यवस्था, ग्रामीण रस्त्यांची अवस्था यावरून सावरकर यांच्याबाबत अनेकांनी सर्वेक्षणात ‘निगेटिव्ह’ प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
सावरकर यांच्या आक्रमकपणाबद्दलही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेकांनी कपाळावर आठ्या आणत टिप्पणी केली आहे. भाजपमधूनही सावरकर यांच्या नावाला संमिश्र पाठिंबा आणि संमिश्र विरोध असे ‘फिफ्टि फिफ्टि’ गुण मिळाले आहेत. संघ आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे ही चाचपणी केली आहे. असे असले तरी सावरकर यांना पर्याय म्हणून कोणताही दमदार चेहरा भाजपकडे नाही. अकोल्यात बहुजन समाजाचे प्राबल्य आहे. या समाजातील बहुतांश लोकांना, तरुणांना सावरकर यांनी भाजपशी जोडले आहे. असे अनेक ‘पॉझिटिव्ह’ मुद्देही सर्वेक्षणाच्या निष्कर्शात आहे. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघातून सावरकर यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.