महाराष्ट्र

Rashmi Barve : जात पडताळणी समितीचा निर्णय न्यायालयाकडून रद्द

High Court : काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा

Political Twist : जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे लोकसभा निवडणुकीला मुकलेल्या रश्मी बर्वे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने जात वैधता समितीचा निर्णय रद्द केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रश्मी बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीने अमान्य केले होते. त्यामुळे रश्मी बर्वे यांना निवडणूक लढता आली नाही. त्यानंतर याच मतदारसंघातून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला.

जात वैधता समितीच्या निर्णयाला रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयातील युक्तिवादात जात वैधता समितीने चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोर्टाने जात वैधता समितीला चांगलेच फटकारले. जात वैधता समितीने रश्मी बर्वे यांना चर्मकार समाजाचे प्रमाणपत्र प्रदान करावे, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मागणी फेटाळली

न्यायालयाने यासंदर्भात जात वैधता समितीला दोन आठवड्यांचा अवधी द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य केला नाही. रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करताना चूक झाली आहे, असे कोर्टाने नमूद केले. याशिवाय चुकीचा निर्णय दिल्याबद्दल कोर्टाने जात वैधता समितीला एक लाखाचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे जात वैधता समितीवर नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे.

राजकारणात सक्रिय

काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे या गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) राजकारणात सक्रिय आहेत. माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांच्या त्या समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. रश्मी बर्वे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल झाल्यानंतर तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत त्यांच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर जात वैधता समितीने रश्मी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. पुरेसा वेळ न मिळाल्याने रश्मी बर्वे या लोकसभा निवडणुकीपासून वंचित राहिल्या.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदारांची नावे गहाळ, जिल्हाधिकाऱ्यांचा बीएलओंना इशारा !

अनेक प्रश्न उपस्थित 

रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीवर गदा आल्यानंतर काँग्रेसने तातडीने हालचाल करत श्यामकुमार बर्वे यांना पुढे केले. महायुतीकडून रामटेकची ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक दिवस रामटेकमध्ये तळ ठोकून होते. मात्र शिवसेनेला (Shiv Sena) येथे यश मिळवता आले नाही. काँग्रेसचे शामकुमार बर्वे यांचा विजय झाला. अशात आता रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द करण्यात आले होते का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!