संपादकीय

Accident : ‘हिट अँड रन’ सैराट..!

Hit And Run : निरपराध व्यक्तींचे बळी, ही खरी वेदना !

या लेखात प्रकाशित मते ही लेखकांची आहेत. द लोकहित या मतांशी सहमत असेलच असे नाही.

Maharashtra Accident : आपल्या परिस्थितीची आणि कर्तव्याची जाणीव असलेली सामान्य कुटुंबातील मुलं आणि मुली जबाबदारीने वागतात. आपल्या मर्यादा त्यांना ठाऊक असतात. आपल्या हातून एखादी लहानशी चूक झाली तर त्याचे कोणते परिणाम होऊ शकतात याचे भानही ते सदैव ठेवतात. चुकीची गोष्ट घडल्यावर ती सुधारायला किंवा त्यातून सावरायला वेळ लागतो, घरातील वातावरण बिघडते याची जाणीव अशा शिस्तीत आणि संस्कारात वाढलेल्या मुलांना असते. त्यामुळे एखादे धाडस करताना त्यांच्या डोळ्यासमोर घरची परिस्थिती, आपली क्षमता आणि कुवत यांचा विचार सर्वप्रथम येतो. अशा विचारपूर्वक वागण्याला आपण विवेक असे म्हणतो. अशी मुलं सरळ मार्गाने जगणारी आणि नियमानुसार चालणारी असतात.

श्रीमंतीचा माज आणि राजकीय दबावाचा कैफ..

आई-बापाच्या ऐश्वर्यावर उड्या मारणारी श्रीमंतीचा माज चढलेली मस्तवाल कार्टी घराबाहेर पडल्यावर काय गुण उधळतात हे घरच्यांनाही ठाऊक नसते. आपली मुलं कुठे जातात, काय करतात, कोणासोबत राहतात याचा त्यांना पत्ता नसतो. मुलांचे रात्री बेरात्री घरी परतणे यावर कुठलेच निर्बंध नसतात. मुलांच्या धुंद अवस्थेने केलेले प्रकार कानावर पडताच त्यांची झोप उघडते. आपली पत आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी मग ही धनदांडगी मंडळी आपली कुवत व क्षमतेनुसार उपाययोजना सुरू करतात. आता श्रीमंतीचा माज चढलेली तसेच राजकीय वरदहस्त लाभलेली नेत्यांची पोरही वेगवेगळ्या लफड्यात अडकत चाललेली आहेत.

खाओ..पिओ.. मौज करो !

धनदांडग्या आणि काही राजकीय नेत्यांच्या बिघडलेल्या आणि पार वाया गेलेल्या मुलांनी आपला दिनक्रम ठरवून घेतलेला असतो. चार पाच जणांचे टोळके मध्यरात्रीनंतर आपले गुण उधळायला निघते. सोबत बाप कमाईची आलिशान पोर्शे किंवा ऑडी असते. बारमध्ये मनसोक्त खाणे पिणे झाल्यावर ही मंडळी तर्र होऊन ‘अपने ही धुंदमें’ बाहेर पडते. आणि ‘एक्सिडंट हो गया रब्बा रब्बा’मध्ये निरपराध व्यक्तींचा बळी जातो. हल्ली असे प्रकार वाढत चालले आहेत.

नागपूर येथील ‘ऑडी’; बावनकुळेंची गाडी..

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात असाच संतापजनक प्रकार घडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात झाला. धंतोली, धरमपेठ सारख्या गजबजलेल्या वस्तीत मध्यरात्रीनंतर झालेल्या या अपघात वरून आता वादविवाद, आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणी बावनकुळे यांच्या मुलाला पध्दतशीरपणे वेगळे ठेवण्याचे प्रयत्न झाले. यालाच काळजीपूर्वक नियोजन म्हणतात. या घटनेत एका काँग्रेस नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे.

Hit And Run Case : पुण्यानंतर आता जळगाव ‘हिट अँड रन’ केसची चर्चा

सर्व नियम धाब्यावर..

रस्त्यावरुन गाडी चालवताना काही नियम पाळावे लागतात. बेधुंद आणि मस्तवाल मंडळी हे सारे नियम धाब्यावर बसवतात. विशेष म्हणजे अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना मदत पुरविण्याऐवजी पळून जातात. आपल्या अक्षम्य चुकीमुळे निरपराध व्यक्ती प्राणास मुकली याची खंत त्यांना नसते. या प्रकरणातून आपण कसे सही सलामत बाहेर पडू याची त्यांना खात्री असते.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी..

ऑडीच्या अपघातानंतर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी खाण्याच्या डिशवरून अकलेचे तारे तोडले. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आता बारमालक कोर्टात जाणार आहे.

सुषमा अंधारे यांचा तोरा..

याच प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तपास अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडले. अगदी चौकशी अधिकाऱ्यांच्या थाटात त्या बोलल्या. अनेक त्रुटींकडे त्यांनी लक्ष वेधले. कुठल्याही घटनेला राजकीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे.

पुणे मुंबई येथील घटना..

पुणे येथे धन्नासेठच्या अल्पवयीन मुलाच्या मस्ती मुळे काही दिवसांपूर्वी असाच अपघात घडला होता. नातवाला जीम मध्ये जाण्यासाठी आजोबांनी त्याला महागडी पोर्शे कार भेट दिली होती. बारावीत अगदी काठावर पास झालेलं हे कार्ट आपल्या मित्रांना पार्टी द्यायला एका बारमध्ये घेऊन गेलं. परतताना अपघात झाला. प्रकरण निस्तरण्याचे पूरेपूर प्रयत्न झाले. यात सहभागी यंत्रणांचा सहभाग उघड झाला.

Eknath Shinde : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ..तर होणार लायसन्स रद्द

निबंधावर टीका..

अल्पवयीन मुलाला ३०० शब्दात निबंध लिहायला सांगण्यात आले. नंतर काँग्रेसने अशीच निबंध स्पर्धा घेतली. त्यात एका स्पर्धकाने मांडलेले विचार मोलाचे होते. ज्या मुलाला तुम्ही अल्पवयीन ठरवित आहात तो दारु पिऊन धिंगाणा घालताना अल्पवयीन नव्हता काय असा रोखठोक प्रश्न विचारला. या मुलाला सज्ञान मानून खटला चालवण्यात यावा अशी स्पष्ट भूमिका निबंध लिहीणाऱ्याने मांडली. पोर्शे अपघातात दोन तरुणांनी जीव गमावला आहे.

मुंबईतील घटना वेदनादायी..

मुंबईत काही दिवसांपूर्वी सकाळी मासोळी खरेदी करून परतणाऱ्या दाम्पत्याला सुसाट कारने धडक दिली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता.

हिट अँन्ड रन..

बेधुंद अवस्थेत सारे नियम झुगारून बेफाम आणि सुसाट आलीशान गाड्या बेदरकारपणे दामटून अपघात घडविण्याचा हा प्रकार आहे. आता हिट अँड रन हा शब्दप्रयोग जनमानसात रुळला आहे. तरुणांची व्यसनाधीनता, त्यांच्या वाईट सवयी आणि संगत त्यास कारणीभूत आहे. अशा मुलांचे पालकही तेवढेच जबाबदार आहेत. उधळायला पैसे मिळतात म्हणून ते उधळतात. त्यावर निर्बंध हवेतच.

व्यसनाधीनता आणि सवयीचे गुलाम..

काही न करता खिशात भरपूर पैसा खुळखुळत राहिला की काहीच कामधंदा न करणारी धनदांडग्यांची ही रिकामटेकडी मुले नको त्या व्यसनाच्या आहारी जातात. आपले कुणी वाकडे करू शकत नाही. कोणत्याही प्रकरणातून आपण सही सलामत बाहेर पडू शकतो असा अती आत्मविश्वास ते बाळगतात. बेदरकारपणे अपघात घडविणाऱ्यांना बरेचदा पाठीशी घालण्याचे प्रकारही घडतात. सवयीचे गुलाम होऊन जगणारी ही व्रात्य मुले नुसती उंडारत राहतात. त्यामुळे पब आणि बारमध्ये धिंगाणा घालमे, मद्यधुंद अवस्थेत बेताल वागणे आणि त्यातून अपराध ङडणे, हे दृष्टचक्र सुरू झाले आहे. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

या बहकलेल्या मुलांचे सर्वच पालक वाईट असतात असे समजण्याचे कारण नाही. अनेक सज्जन आणि निरुपद्रवी व्यक्तींची मुले वाईट संगतीने अशा प्रकरणात अडकतात आणि ताशेरे मात्र आई वडिलांवर ओढले जातात. अशा घटनांतील जबाबदारी कोणालाही झटकता येणार नाही. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींना शासन व्हायलाच हवे. अलीकडे घटना कोणतीही झाली की त्या बाबत राज्यकर्त्यांवर ताशेरे ओढले जातात. दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्या घटनेवरून थेट राजीनाम्याची मागणी केली जाते. हा प्रकार योग्य म्हणता येणार नाही. अशा प्रकरणात संबंधित सर्व यंत्रणांनी कोणताही दुजा भाव न करता निष्पक्षपणे कारवाई करणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणात मुळीच हस्तक्षेप करता कामा नये. अपराध करणा-यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. तपास करताना काही चुका जाणूनबुजून केल्या जातात. गुन्हेगारांसाठी त्या फायद्याच्या ठरतात.

जबाबदारी सर्वांचीच 

लाखो व्यक्ती चारचाकी वाहने चालवतात नियमानुसार वाहन चालवित असल्याने त्यांचे हातून अपघात होत नाहीत. स्वतः च्या जीवासोबत दुसऱ्यांच्या जीवाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी समजून ते वागतात. हे शहाणपण सर्वांनी अंगी बाणवणे आवश्यक ठरते. कारण जीवन हे अनमोल आहे. निरपराध व्यक्तींना तुडवले आणि नाहक यमसदनी धाडणे हे कृरपणाचे तसेच रानटी वृत्तीचे लक्षण आहे. या सुसाट आणि सैराट वागण्याने निरपराध व्यक्तींचे नाहक बळी जातात ही खरी वेदना आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!