New Development : नागपूर विमानतळाचे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. न्यायालयीन प्रक्रियेत विमानतळाचे काम अडकून पडले होते. त्यामुळे विमानतळाचे काम तीन ते साडेतीन वर्ष प्रलंबित राहिले. आता जागतिक दर्जाचे विमानतळ नागपुरात होणार आहे. नागपूर भारताच्या मधोमध आहे. त्यामुळे जगाशी आणखी व्यापकपणे नागपूर जोडले जाई, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नव्या विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूरच्या उन्नत विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन केले. यानंतर गडकरी बोलताना प्रसंगी नागपूरचं विमानतळ तोडायला लावू असं म्हणाले.
तर नागपूरचा फायदा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार आशिष देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, नऊ लाख टन कार्गो निर्यात विमानतळावरून होईल. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. नागपूरचा मोठा फायदा होईल. ताडोबा जंगल सफारीसाठी देशविदेशातून पर्यटक येतात. त्यांनाही अत्याधुनिक सुविधा मिळतील, असे गडकरी म्हणाले.
भरपूर विकास
आठ ते दहा चांगल्या आर्किटेकची निवड करावी. त्यांच्याकडून प्रेझेंटेशन घेण्यात यावं. त्यातून एक डिझाइन निवडावं, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी दिली. अजनी रेल्वे स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. रायफोड येथे कामाला सुरुवात झाली आहे. त्यातून 68 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. आता त्याचा विस्तार होईल. एम्स,आयआयएम, सिम्बॉयसिस विद्यापीठ नागपुरात आले आहे. आता नागपुरात अत्याधुनिक विमानतळ होत आहे. या विमानतळामुळे नागपूर आणि विदर्भाचे नाव ‘ग्रोथ इंजन’ म्हणून उदयास येईल, असेही गडकरी म्हणाले.
नवीन विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेईल, तेव्हा त्यात जैवइंधनाचा वापर करावा. हे इंधन पुरविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार केलेले हे इंधन असावे. या इंधनाचा वापर करून विमान आकाशात झेपावेल. नागपूरच्या या विमानतळाला ‘ग्रीन एअरपोर्ट’ बनविण्याचे स्वप्न आहे. आपण या कामावर देखरेख ठेवणार आहोत. विमानतळाचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. ज्या भागातील काम दर्जेदार नसेल तर प्रसंगी तोडायला लावू, असा इशाराही गडकरी यांनी दिला.
तर कामाची सुट्टी करू
काही अधिकारी, कर्मचारी काम करीत नाहीत. काही कंत्राटदार भ्सलतंच काही तरी करून ठेवातात. त्यामुळे अशा कितीतरी लोकांना ‘ब्लॅक लिस्ट’ केलं आहे. किती लोकांना निलंबित केलं आहे. किती लोकांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली आहे. जे काम करत नाही, त्यांना आपण सुट्टी देतो. आपण दर आठवड्याला माहिती घेत असतो. त्यामुळं नागपूर विमानतळाचं काम नक्कीच चांगलं आणि दर्जेदार होईल, काम कराल आणि त्यातून एक चांगलं विमानतळ तयार होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.