Municipal elections : राज्यातील महानगरपालिकांमध्ये सध्या प्रशासकीय राज आहे. आयुक्तांच्या भरवशावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कारभार सुरू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकारणही थंडबस्त्यात पडले आहे. यावर्षभरात लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका झाल्यामुळे मोठे नेते तर चार्ज झाले. पण कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना प्रचारात उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. आता लवकरच राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजेल, अशी आशा व्यक्त होत आहे. अशात आमदार-खासदारांना इच्छुकांनी गराडा घातला आहे. ‘भाऊ तुमचं झालं, आता आमचं लक्षात ठेवा’ या शब्दात ते आठवण करून देत आहेत.
नागपूर, अमरावती, पुणे, मुंबईसह राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये प्रशासनाच्या हाती कारभार आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवारांकडे गेल्या तीन वर्षांत काय केले, हे सांगण्यासाठी काहीच नाही. त्यांना भविष्यातील योजना आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. एकट्या मुंबई क्षेत्रात नऊ महानगरपालिका आहेत. त्या देखील वेटिंगवर आहेत. विशेष म्हणजे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेची अद्याप एकही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांचे राजकारण थांबून गेलेले आहे.
नागपूर महानगरपालिकेत फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये निवडणूक अपेक्षित होती. पण न्यायालयात प्रकरण असल्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. त्याचा काही प्रमाणात का होईना लोकसभा निवडणुकीवर परिणाम झाला. अख्ख्या नागपुरात एकही नगरसेवक नाही. छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या नेत्याकडे कुठलेही पद नाही. शिवाय महापालिका निवडणूक कधी होईल, याची खात्री नाही. त्यामुळे मंडळ बैठका, बुथप्रमुख यांच्या श्रमावरच भाजप आणि काँग्रेसला अवलंबून राहावे लागले. त्यामुळे प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागले.
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक होणार याची खात्री स्थानिक नेत्यांना होती. त्यामुळे ते आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी तर मैदानात उतरले. मात्र, महापालिका निवडणुकीत आपल्यावर कृपा होईल, ही अपेक्षाही त्यांनी ठेवली. 2017च्या निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. विजयी झालेले 152 नगरसेवक आणि 5 नामनिर्देशित सदस्य अशी एकूण 157 नगरसेवकांची महानगरपालिका अस्तित्वात होती. आता प्रभाग रचनेच्या संदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या निकालाचा फायदा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमताचा महापालिका निवडणुकीवर परिणाम होईल, असे भाकित वर्तवण्यात येत आहे. नागपूरमध्ये सहापैकी चार जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवण्याची संधी भाजपकडे आहे. तर मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न यंदा पूर्ण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.