Mukul Wasnik : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे महाविकास आघाडीच्या वतीने राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांची मांदियाळी दिसून आली. खासदार राहुल गांधी या सभेला येणार होते मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने, ते येऊ शकले नाहीत. दरम्यान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचे प्रमुख भाषण या सभेत झाले. त्याआधी खा.मुकुल वासनिक यांचे भाषण चांगलेच गाजले. चिखलीच्या या भाषणातून मुकुल वासनिक यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांना टार्गेट केल्याचे दिसले.
राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करतात तर दुसऱ्या बाजूला बुलडाण्याचे आमदार राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य करतात, असे म्हणत गायकवाड यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची लाट उसळली आहे. शिंदे-फडणवीस -अजित पवारांनी ज्या पद्धतीने नीच राजकारण केले त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचेही मुकुल वासनिक म्हणाले. बुलडाण्याच्या आमदारांनी राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य केले. त्यावेळी शिंदे फडणवीस पवार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करतील असे वाटले होते. मात्र गचाळ आणि वाचाळ भाषेचा वापर करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांनी गायकवाडांना पुन्हा उमेदवारी दिली. संजय गायकवाड हे शिंदे, फडणवीस, पवार, अमित शहांचे प्रतिनिधी आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
त्याचवेळी राहुल बोंद्रे, जयश्री शेळके यांना विजयी करण्याचे आवाहन वासनिकांनी केले. राज्याच्या सत्ता परिवर्तनात बुलडाणा जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असला पाहिजे असेही वासनिक म्हणाले.
गायकवाडांना ‘गुंड’ म्हणून डिवचले!
राहुल गांधींची जीभ शोचित वंचित घटकांसाठी चालते. राहुल गांधी या देशातल्या अन्नदात्यासाठी बोलतात. ते सामान्यांच्या अधिकाऱ्यांसाठी बोलतात. सामान्यांच्या हक्कासाठी बोलणारी राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य बुलडाण्याचा गुंड नेता करतो. महायुतीवाल्यांचे डिपॉझिट जप्त करा असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी केले. चिखली येथे आयोजित जाहीर सभेत कुणाल चौधरी यांनी महायुती सरकारच्या धोरणांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. मात्र शोषित वंचित आणि दलितांचा आवाज बुलंद करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य बुलडाण्याचा गुंडा नेता करतो अशा शब्दात त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला.