संपादकीय

Mahayuti : सहानुभूतीच्या लाटेला, ‘लाडक्या बहिणी’चा उतारा !

Ladaki Bahin Yojana : सत्ताधाऱ्यांना होतोय विरोधक भांबावले असल्याचा भास.

या लेखात प्रकाशित मते ही लेखकांची आहे. या मताशी ‘द लोकहित’ सहमत असेलच असे नाही.

Assembly Election : सध्या श्रावण महिना सुरू आहे. व्रतवैकल्याचा महिना असल्याने विविध ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या महिन्यात भगवान शीव शंकर उपासनेला विशेष महत्त्व असते. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या धार्मिक आवाहनामुळे श्री. शंकराला जलाभिषेक करण्याच्या प्रथेला नव्याने उजाळा मिळाला आहे.

एकंदरीत वातावरण भक्तिमय झाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने ते परंपरेने आणि आनंदाने साजरे होत आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्येही वेगळाच उत्साह संचारला आहे. सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. सत्ता आपलीच येणार, असा दावा सत्ताधारी आणि विरोधक करत आहेत. राज्यातील सत्ता पून्हा आपल्याकडे ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. थेट लाभ देणा-या योजना दणक्यात सुरू झाल्या आहेत.

लाडकी बहीण लाडाचीच 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. रक्षाबंधनापासून बहिणींच्या खात्यात दिड हजार ते तीन हजार अशी रक्कम जमा होत आहे. योजना शुभारंभाच्या कार्यक्रमातून ही योजना पुढेही सुरू राहील, असे अभिवचन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देत आहेत. या योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधक भांबावले असल्याचा भास सत्ताधाऱ्यांना होतोय. पण हा लाच देऊन मते विकत घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

अशातच राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवस पूढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला योजनांच्या प्रसिद्धीसाठी थोडा वेळ मिळावा म्हणून निवडणूक उशिरा होत आहे, अशी ओरड विरोधक करीत आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर निवडणुकांना सामोरे जायचे, असे महायुतीचे नियोजन असल्याची माहिती आहे. बहि‍णींना नियमित पैसे मिळू लागले आहेत. मोफत गॅस सिलिंडरही मिळत आहेत, अशी विश्वासाहर्ता बहीणींच्या मनात निर्माण झाल्यावर निवडणूक होण्याची शक्यता आहे. मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी महायुतीने खेळलेली ही हुशारीची खेळी आहे.

Raj Thackeray : अकोल्यात मनसेला येतील का ‘अच्छे दिन’?

लाडकी बहिण योजनेमुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीची तारांबळ उडाल्याचे काही अंशी दिसते. विरोधकही योजनेचे समर्थन करताना दिसतात. आपले सरकार आल्यास आपण अधिक रक्कम देऊ, असे आश्वासन तेही देत आहेत. योजनेचा अवश्य लाभ घ्या, पण मतदान आमच्या आघाडीला करा, अशी दुहेरी चाल खेळली जात आहे.

लोकसभेत मताचा फटका

लोकसभा निवडणुकीत महायुती ला फटका बसला. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षात फूट पाडण्यात आली. त्यांचे प्रतिकूल परिणाम निकालात दिसले. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांना सहानुभूती मिळाली. सहानुभूतीच्या वाटेला उतारा म्हणून महायुतीने लाडकी बहिण योजना सुरू केली. योजनेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे महायुतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या योजनेचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. सरकारी जाहिरातीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो झळकत आहेत. आता विजय दूर नाही अशी वातावरणनिर्मिती झाली आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवारी मिळवण्यावरून वाद आणि संघर्ष सुरू आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी मिळाली नाही तर काही जण बंडखोरी करण्याची भाषा बोलत आहेत. काही उमेदवारांनी तर आपल्याला तिकीट मिळेल, या आशेने निवडणुकीची तयारी करून ठेवली आहे.

Supreme Court : संजय राऊत म्हणाले, “ये अंधा कानून है”!

उमेदवारी न मिळाल्यास त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी विरोधकांशी लढण्याआधी पक्षातल्या प्रतिस्पर्ध्यांसोबत प्रथम लढा द्यावा द्यावा लागेल, अशी काही मतदारसंघातील स्थिती आहे. हा कलह असाच कायम राहिला तर लाडकी बहिण योजनेतून तयार झालेल्या अनुकूल वातावरणाला तडा जाण्याची भीतीही आहेच.

निवडणुकीत स्पर्धा

महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख प्रतिस्पर्ध्यात ही निवडणूक होणार आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलन, आंदोलन चालवणारे नेते त्यांच्या भूमिका याचाही निवडणुकांवर परिणाम होणार आहे. प्रत्येक जण निवडणूक लढण्याची तसेच पाडापाडीची भाषा बोलू लागला आहे. आपल्याला जास्तीत जास्त मते कशी मिळतील, तसेच विजयश्री कशी खेचून आणता येईल, याची काळजी सर्वच पक्षांना पडली आहे. सत्ताधारी महायुतीने या प्रश्नाचे उत्तर लाभकारी योजना जाहीर करुन मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!