महाराष्ट्र

MSRTC News : पगार वाढला संप मिटला!

Salary Increment : एसटी कर्मचारी कामावर परतणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपसलेली संपाची तलवार अखेर म्यान केली आहे. गुरुवारपासून सर्व कर्मचारी कामावर परतणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. यात कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 6500 हजार रुपयांची वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचे हाल होण्यापासून वाचले आहेत. शिवाय विविध योजनांचं ओझं डोक्यावर घेणाऱ्या सरकारचा महसूलही बुडण्यापासून वाचला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप दुसऱ्या दिवशी सायंकाळी मागे घेतला. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचारी संघटना कृती समितीची बैठक झाली. बुधवारी झालेल्या या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून एसटी कामगार कृती समिती कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात राज्यातील 11 कामगार संघटनेच्या कृती समितीचा सहभाग होता. शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, मागील वेतन वाढीतील त्रुटी दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ देणे, मेडिकल कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या.

बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यात विशेष म्हणजे, कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 6500 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच घरभाडे भत्ता मिळावा, या मागण्यांना मात्र मुख्यमंत्र्यांनी फाटा दिला.

22 कोटींचा महसूल बुडाला

या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. संपाच्या दुसर्‍या दिवशी एसटीचा सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर राज्यभरातील 251 पैकी 94 एसटी आगार पूर्णपणे बंद होते.

राष्ट्रपतींचा दौरा अन् एसटीचा संप

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील यांची देखील उपस्थिती होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. मात्र आता संप मिटल्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

असा वाढला पगार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना दि. १ एप्रिल २०२० पासून सरसकट मूळ वेतनात ६५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘सगळ्या एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात सरसकट ६५०० रुपयांची वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये २०२१ मध्ये पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना २०२१ मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात ४ हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांच्यावतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. संप यशस्वी झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे.’

संघटना काय म्हणते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो. जे मागायला गेलो ते सढळ हस्ते पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं आहे. साडे सहा हजार रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून 2000 कर्मचारी घरी बसले आहेत. लहानसहान केसेससाठी घरी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात असे प्रथमच झाले आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!