Hunger Strike For Naming Ceremony : गेल्या चार दिवसांपासून पोंभुर्णा शहरात सुरू असलेले उपोषण राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ पदाधिकाऱ्यांना सूचना देत सोडविले. जुना बसस्टॅन्ड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे नाव देण्यात यावे, अशी मागणी होत होती. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भुजंग ढोले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची खडानखडा माहिती ठेवणाऱ्या मुनगंटीवार यांना याबाबत कळले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली.
चार दिवसांपासून ढोले उपोषण करीत असल्याचे कळल्यानंतर मुनगंटीवार यांनी भाजपचे प्रतिनिधी मंडळ ढोले यांच्या भेटीसाठी पाठविले. ढोले यांनी चौकाच्या नामकरणाचा मुद्दा सर्वांसमक्ष मांडला. त्यानंतर नगर पंचायतीतील भाजपा नगरसेवकांनी सर्वसंमतीने ठराव करून स्थानिक जुना बसस्टॅन्ड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात येईल, असे पत्रच दिले. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तातडीने यासाठी पावले उचलली. जुना बसस्टॅन्ड चौक यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक म्हणून ओळखला जाईल, असे त्यांनी सांगताच आनंद व्यक्त करण्यात आला.
ठराव घेण्याची सूचना
शुक्रवारपासून (ता. 16) भुजंग ढोले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही मिनिटांत मागण्या मान्य करून नगरपंचायतीला यासंदर्भातील ठराव करण्याची सूचना केली. त्यानुसार पोंभुर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरसेविका नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, श्वेता वनकर, रोहिणी ढोले, शारदा गुरनूले, नगरसेवक संजय कोडापे, दर्शन गोरंटीवार, महेश रणदिवे, उषा गोरंतवार यांनी सर्वसंमतीने नामकरणाचा ठराव केला. यासंदर्भात उपोषणकर्ते भुजंग ढोले यांना ठरावाची प्रतही सोपविली.
उपोषणस्थळी नगराध्यक्ष पिपरे, उपनगराध्यक्ष मंगळगिरीवार व भाजपचे शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे यांचे हस्ते लिंबूपाणी घेत ढोले यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी बोलताना भोंगळे म्हणाले, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची दारे उघडली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ नामकरण करण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुढकार घेतला. त्यांच्याच मुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव मिळाले. पोंभुर्णा शहरातील विविध समाजाच्या नागरिकांनी विकासासंदर्भात केलेल्या प्रत्येक मागणीला पूर्ण करण्याचे काम मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्ण्यात माळी समाजासाठी भव्य सामाजिक सभागृहाची निर्मितीसुद्धा मुनगंटीवार यांनीच केली. मुनगंटीवार यांनी नेहमीच जातीपातीच्या पलीकडेच जात महापुरुषांचा सन्मान केला, असे भोंगळे म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ऊर्जेच्या स्रोत आहेत, असेही ते म्हणाले.