MP Sanjay Deshmukh : यवतमाळातील गुन्हेगारीचा मुद्दा गुरुवारी (ता. 8) लोकसभेत गाजला. यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक काळातही गैरप्रकार झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यवतमाळसह राज्यातील पोलिस मनुष्यबळ वाढविण्यात यावे, पोलिसांना सायबर गुन्ह्यांशी सामना करण्यासाठी व्यापक तंत्रज्ञान व प्रशिक्षण देण्यात यावं, अशी मागणीही खासदार देशमुख यांनी केली. गुरुवारी लोकसभेतील चर्चेदरम्यान देशमुख यांनी गुन्हेगारीच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी गुन्हेगारीच्या विषयावर निवेदन केले.
खासदार देशमुख यांनी गेल्या काही दिवसात यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती आकडेवारीसह केंद्र सरकारपुढे ठेवली. राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण यवतमाळमध्ये असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) काळात काही गुंडांनी गैरप्रकार केल्याचा दावाही देशमुख यांनी केला. यवतमाळसह राज्याच्या पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास नीट होत नाही. गुंडगिरी करणाऱ्यांवर वचक कायम राहिलेला नाही. त्यामुळे यवतमाळसह महाराष्ट्रातील मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
तंत्रज्ञान शिकवा
अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण वाढले आहे. पंरतु त्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिस सक्षम नाहीत. त्यांच्याकडे पुरेशी साधनसामग्री नाही. त्यांना तांत्रिक प्रशिक्षणही नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. अशात त्याचा परिणाम तपासावर होतो. सायबर गुन्हेगार मोकाट राहतात. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) अत्याधुनिक साधनसामग्री पुरविणे नितांत गरजेचे आहे. यासोबतच जगाच्या पाठीवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण पोलिसांना दिले जावे, अशी आग्रही मागणीही खासदार संजय देशमुख यांनी सरकारकडे केली. राज्य आणि केंद्र सरकारने हे प्रशिक्षण एकत्रितपणे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
महिलांच्या सुरक्षेचा (Women Safety) मुद्दाही खासदार देशमुख यांनी उपस्थित केला. यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे ते लोकसभेत म्हणाले. मंगळसूत्र हे स्त्रीधन असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अंमलीपदार्थांची (Drugs) विक्रीही वाढत आहे. मात्र यासंदर्भात पोलिस गंभीर दिसत नसल्याची टीका देशमुख यांनी केली. या सगळ्यामुळे तरुणाई भरकटत आहे. त्यामुळे तरुणाईत व्यापक जनजागृती करण्याची मागणीही खासदार देशमुख यांनी केली. महाराष्ट्रातील पोलिस दलाची परिस्थिती सुधरविण्यासाठी केंद्र सरकारला हस्तेक्षेप करावा लागणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे उपाय करावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली.