Maharashtra Politics : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. परंतु त्यांच्याकडून स्वत:च्याच प्रदेश सांभाळला जात नाही. प्रयागराजमध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात निवडणूक प्रचार करीत आहेत. जातीय विष पेरण्यातच ते धन्यता मानत आहेत. स्वत:च्या राज्याकडं दुर्लक्ष करीत ते दुसऱ्या राज्यात वेळ वाया घालवत आहेत, अशी टीकी खासदार चंद्रशेखर आझाद यांनी केली. ते गुरुवारी (14 नोव्हेंबर) नागपुरात बोलत होते.
आपण महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात करीत आहोत. त्यासाठीच आपण नागपुरात आलो असल्याचं आझाद म्हणाले. नागपुरात दीक्षाभूमी येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करीत असल्याचं ते म्हणाले. दीक्षाभूमी येथे प्रार्थना करीत आपण प्रचाराचा नारळा फोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महापुरुषांना नमन करून सुरू केलेलं कार्य नक्कीच यशस्वी होतं, असा विश्वासही आझाद यांनी व्यक्त केला.
विदर्भात दौरा
खासदार चंद्रशेखर आझाद यांनी विदर्भातील नागपूर, अमरावती, अचलपूर येथे सभा घेत असल्याचं जाहीरक केलं. सात ते आठ जागांवर विदर्भात निवडणूक लढत आहोत. आझाद पार्टीला यंदाच्या निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देण्यात येत आहे. हा नारा मुळातच उत्तर प्रदेशातून आला आहे. उत्तर प्रदेशात जातीचं हेच विष पेरण्यात येत असल्याची टीकाही चंद्रशेखर आझाद यांनी केली. महाराष्ट्रात येऊन नारेबाजी करायची पण आपल्या प्रदेशाकडं दुर्लक्ष करायचं, असं सध्या सुरू असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात स्पर्धा परीक्षेच्या मुद्द्यावरून तरुणांमध्ये नाराजी आहे. सरकार एकाचवेळी एक पेपर घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत सरकार ‘वन नेशन, वन ईलेक्शन’बाबत बोलत असल्याचंही आझाद म्हणाले. हे सगळं करण्यासाठी सरकामध्ये मोठी हिंमत लागते. मात्र सरकारजवळ नियम आणि हिंमत दोन्ही नसल्याचं खासदार चंद्रशेखर आझाद म्हणाले. जातीवादाचं विष तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. केंद्रा आणि अनेक राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे. पण त्यानंतरही ही मंडळी सामान्यांसाठी काहीही करू शकत नसल्याचं आझाद म्हणाले.
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी आपला पक्ष प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यामुळं यंदा पक्षाला चांगलं यश मिळेल. महाराष्ट्रात सध्या परिस्थिती विचित्र झाली आहे. लोक सरकारपासून नाराज आहेत. कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल, याचा नेम नाही. त्यामुळं लोकांना स्थिर सरकार हवं आहे. आंबेडकरी चळवळीला फोडण्याचंही काम होत आहे. परंतु चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येत काम करणार आहेत. त्याला नक्कीच यश मिळेल, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले.