Nagpur District : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आई प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे सोमवारी (ता. एक) दुपारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. अल्प आजारामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नारायण, दत्तू, नंदकिशोर ही चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी (ता. 2 जुलै) सकाळी 10 वाजता त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानावरून निघेल. कोलार घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रभावती बावनकुळे यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपचे राज्यभरातील नेते कोलार घाट येथे भेट देऊ शकतात. त्यामुळे तसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बावनकुळे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे समर्थक शोकसागरात बुडाले. अनेकांनी तातडीने बावनकुळे यांचे निवासस्थान गाठत शोकसंवेदना व्यक्त केल्या. भाजपसह महायुतीमधील अनेक नेत्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभावती बावनकुळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. विधिमंडळातील अनेक आमदारांनी देखील बावनकुळे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली.