BJP Vs congress : एखादी वस्ती, एखादे नगर विशिष्ट्य जाती-धर्माचे, विचारांचे म्हणून ठपका लावला जातो. पण निवडणूक येते तेव्हा विचारभिन्नता असलेले लोक आमने-सामने उभे ठाकतात. तर बरेचदा उमेदवार बघूनही त्या क्षेत्रातील मतदार निवडणुकीपुरता वैचारिक मतभिन्नता बाजुला ठेवतात. याच समिकरणाचा फटका भाजपचे दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते यांना बसू शकतो. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत दक्षिणमध्ये वाढवलेला जनसंपर्क भाजपसाठी घातक ठरू शकतो, असे चित्र सध्या मतदारसंघात आहे.
कोण देईल मत?
दक्षिण नागपूर हा तसा संमिश्र मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुस्लिम, कुणबी, तेली, ब्राह्मण, दलित अशा सर्व जाती-धर्मांचे मतदार आहेत. पण मोहन मते यांच्यासाठी कुणबी मतदारांसह भाजपचा पारंपरिक मतदार ही जमेची बाजू होती. तरीही 2019मध्ये अवघ्या 4013 मतांनीच त्यांचा विजय झाला. काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी केलेली कामगिरी त्यांचे पक्षश्रेष्ठी तर विसरलेले नाहीच, पण भाजपही विसरलेले नाही. पांडव यांनी 2019 च्या पूर्वी दक्षिण नागपुरात वाढवलेला जनसंपर्क त्याला कारणीभूत होता.
विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाशेजारी असलेला परिसर आपलाच आहे, असा गैरसमज भाजपने तेव्हा करून घेतला. तो आजही कायम आहे. मोहन मते यांच्यापेक्षा गिरीश पांडव यांनी डोअर-टू-डोअर वाढवलेला संपर्क 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. अनेक वस्त्या आजही काँग्रेसच्या पारंपरिक मतदार म्हणून ओळखल्या जातात. या मानसिकतेतून बाहेर काढण्याची संधी भाजपच्या आमदारांना होती. मात्र, केवळ नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांच्या भरवशावर ते राहिले. व्यक्तिगत जनसंपर्क वाढविण्यात गिरीश पांडव यांच्या तुलनेत तर नक्कीच मागे आहेत, असे सध्या दिसते.
कामठीचा प्रश्न
दक्षिण नागपूर मतदारसंघ अगदी कामठी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत जाऊन पोहोचतो. नवीन सुसज्ज वस्त्या, अनधिकृत वस्त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. या भागात आज पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गडकरी आणि फडणवीसांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण त्याठिकाणी मोहन मते यांचा प्रभाव किती आहे, हा प्रश्न आहे. विशेषतः रिंग रोडला लागून असलेला मानेवाडा, म्हाळगीनगर, उदय नगर हा परिसर नवीन लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या परिसरांना लागून अनेक नव्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी लोकसभेत देखील भाजप व्यवस्थित पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे 2019च्या तुलनेत जवळपास 14 हजारांनी गडकरींची आघाडी दक्षिणमध्ये कमी झाली होती. एकूणच काँग्रेसपेक्षा भाजपपुढेच दक्षिण जिंकणे एक मोठे आव्हान असल्याचे बोलले जाते.
सुधाकर कोहळे विसरले नाहीत!
2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारून मोहन मतेंना दिले, त्यामुळे सुधाकर कोहळे नाराज होते. त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष करून शांत केले. पण दक्षिणच्या उमेदवारीसाठी त्यांचा दावा कायम होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. मात्र, 2024 मध्ये पक्षाने पहिल्याच यादीत मोहन मतेंचे नाव जाहीर केले. संतप्त कोहळेंना पश्चिममध्ये पाठवण्यात आले. पण कोहळेंच्या जुन्या जमखा ताज्या आहेत. त्यांचे समर्थक मोहन मतेंचे गणीत बिघडवू शकतात, हे विसरून चालणार नाही.