Bhandara Gondia constituency : देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांचे एकमेव मंत्रीमंडळ असे आहे, ज्यात ओबीसी, एसटी, एनटी आणि वंचित प्रवर्गाला ६० टक्के स्थान मिळाले. भाजपा वंचित घटकाचे हित जोपासणारा असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तिरोडा येथे भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असताना तुमसर, तिरोडा व पवनी याठिकाणी सभा झाल्या. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा जनतेला संबोधित केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठे आश्वासन सुद्धा याप्रसंगी दिले.
Lok Sabha Election : रणधुमाळी जोरात भाजपच्या प्रचारसभा, काँग्रेसचा कॉर्नर सभांवर भर
तीनशे युनिट विजेचे होणार मोफत वितरण
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले, सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौरकृषी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्याचे सुद्धा आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे १२हजार रुपये राशी शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध झाल्याचे सांगत मोदी सरकार शेतकरी कल्याणाचा विचार करणारे असल्याचे ते म्हणाले. दरम्यान युवक, महिला आणि शेतकरी वर्गासाठी कल्याणकारी योजना येणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.
विरोधकांकडे दिशाच नसल्याची टिका
राहुल गांधी यांच्या संबोधनांत उमेदवाराचाच उल्लेख करण्याचे ते विसरले. त्यामुळे त्यांच्याकडे देशाला विकसित करण्याची ध्येय धोरणे आणि दिशाच नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मंचावर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, माजी खासदार व महायुतीतील वरिष्ठ नेते प्रामुख्याने उपस्थित होते.