Shiv Sena : काँग्रेसला गेल्या 75 वर्षांत जे जमले नाही ते आम्ही दहा वर्षात केले असल्याचा दावा नरेंद्र मोदी करीत आहेत. हा दावा अगदी खरा आहे. 75 वर्षांत काँग्रेसने जेवढे देशाला लुटले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ अमरावतीत आयोजित सभेत बोलत होते.
पुढच्या तीस वर्षात तुम्ही काय करणार आहात, हे सांगत बसण्यापेक्षा मागच्या दहा वर्षात काय केले? त्याचा आधी आम्हाला हिशोब द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. अमरावती लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये सभा घेतली. यात त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
राणांच्या पराभवासाठी मैदानात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कट्टर राजकीय वैरींमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा हे नाव सध्या सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये राणात दाम्पत्याने हनुमान चालीसा पठाण आंदोलन केले होते. याशिवाय वेळोवेळी राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यामुळे नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना देखील मैदानात उतरली आहे.
Lok Sabha Election : निवडणूक आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस
अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत राणांना पराभूत करण्यासाठी व्यूहरचना केली आहे. विदर्भातील ज्या मतदारसंघांबाबत उद्धव ठाकरे आक्रमक आहेत त्यापैकी एक अमरावती मतदारसंघ आहे. त्यामुळेच राणांना पराभूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः अमरावतीच्या मैदानात उतरले. सांस्कृतिक भवनात आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नवनीत राणा दोघांवरही टीका केली. मात्र आपल्या भाषणात ठाकरेंनी बहुतांश वेळपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली.
पूर्ण राज्यात देशात मोदीविरोधी लाट दिसते. आचार संहितेवेळी काळजी वाहू प्रधानमंत्री त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत. जोपर्यंत प्रधानमंत्री शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये होते तेव्हा किती वेळा महाराष्ट्रात आले होते. आता गल्लीबोळामध्ये जात आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नाही. काँग्रेसच्या खिशात असलेले पैसे फ्रिज केले. ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही लढाई आहे, असे ठाकरे म्हणाले.